Saturday 2 April 2016

पाळणा


::::::::: पाळणा ::::::::::

सुमनेपोटी गर्भ राहिला।साऱ्या घराला आनंद झाला
दिसामासी गर्भ वाढिला।।

कानोकानी खबर गेली।सुमनेची माय धावुनि आली
डोहाळपूर्ती तिने हो केली।।जो बाळा जो रे जो...१

नवमास भरता आल्या कळा।जन्म दिला गोंडस बाळा
हर्षाने तिच्या पाणी आले डोळा।।

बाळ गोमटा पाहुनी सुंदर।मनी एकच आला विचार
कुळाचा अपुल्या करील हो उद्धार।।जो बाळा जो रे जो...२

बाराव्या दिवशी बारसे केले।पाळण्याला पुष्पहार गोवले
नाव सुलभ शाम ठेविले।।

चंद्रकलांनी बाळ वाढले।पाय त्याचे पाळण्यात दिसले
रुप मनोहर मनी हो ठसले।।जो बाळा जो रे जो...३

पहिल्या वर्षी टाकले पाऊल।जग जिंकायाची लागली चाहूल
हर्ष मनात दाटला विपुल।।

नाना कळांनी अंगण फुलले।दुडूदुडू चालीने बाळ धावले
माता-पिता ते धन्य हो झाले।।जो बाळा जो रे जो...४

सहाव्या वर्षी दिवस पहिला।शिक्षणाचा त्याने श्रीगणेशा केला
धडा ज्ञानाचा पहिला गिरविला।।

गुरुचा त्याने आदर केला।बुद्धीचा पुरावा सादर केला
रागाने कधी ना उद्धार हो केला।।जो बाळा जो रे जो...५

बाराव्या वर्षी बारा भानगडी।कृष्ण समजुनि शाम करितो खोडी
गोपिकांना लावतो लाडीगोडी।।

शाळेचे त्याने गोकुळ केले।हुशारीने गोपींना भुलविले
कौतुके श्रीराम शाळेत हो गेले।।जो बाळा जो रे जो...६

अठराव्या वर्षी परिवर्तन झाले।बाळ शाम तरुण झाले
ध्यान बगळ्याचे लावून बसले।।

झाली कैकदा दिलाची गोची।आपटल्या पाण्यावरी चोची
नाही गवसली पोर हो कुणाची।।जो बाळा जो रे जो...७

चोविसाव्या वर्षी तरारले मन।सुरु जाहले वधूसंशोधन
सप्तजन्माचे बांधण्या बंधन।।

दिस रोजचा लागला ढळाया।लागल्या शामला निशा छळाया
तरुणी लग्नाच्या लागल्या हो टाळाया।।जो बाळा जो रे जो...८

एकोणतीसाव्या वर्षी मांडव दारी।जीवनी आली सुलभा धन्वंतरी
भरुन निघाली जीवनाची दरी।।

सुखाचा त्यांनी संसार केला।कळी सुंदर आली वेलीला
नाही पारावार आनंदाला हो उरला।।जो बाळा जो रे जो...९

वाढता वाढे बाळाचे वय।पकडली आता शब्दांची लय
काव्याने दिले प्रसिद्धीचे वलय।।

प्रवास इथपर्यंतचा मांडून झाला।शुभेच्छा आता पुढच्या प्रवासाला
पाळणा असा हा अनिलने हो लिहिला।।जो बाळा जो रे जो...१०
...............................................
(साहित्यातला एक जुना प्रकार "पाळणा" लिहीण्याचा हा प्रयत्न!)

          ✒अनिल सा.राऊत
              📱9890884228

No comments:

Post a Comment