Monday 31 August 2015

.....झाला पावन सावता!

           
(सावता गीतमाला गीत क्र.२)

         ....झाला पावन सावता!

नको नको विसरु आता, माळियाच्या या भक्ता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।धृ।।

गातो विठ्ठलाची गाणी,हात राबता राबता
टाळ चिपळ्याची साथ,देई गुणी रे पावटा
आत डोलतो विठ्ठल,वारा शीळ रे घालता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।१।।

दिंडी मोटेची निघाली,दिस फाकता फाकता
तरारला कांदा-मुळा,वारी पाण्याची पोचता
झाला वेडापिसा देव,असा सोहळा पाहता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।२।।

झाले मंदिर शेताचे,पीक जोजता जोजता
धाटा-धाटापरि उभा,विठू भक्ताच्या स्वागता
सेवा मातीची करुनि,तिथे टेकावा माथा
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।३।।

भाव-भक्तीच्या नादात,किती चालता चालता
देव पाहावा रानात,घाम मातीत गाळता
अशी पुण्याई सांगते,माझ्या अरणची गाथा
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।४।।

नको नको विसरु आता, माळियाच्या या भक्ता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता....

©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

लाभे पुण्य आम्हां...





(सावता गीतमाला गीत क्र.१)       

          लाभे पुण्य आम्हां....

धन्य अरण भूमी,
धन्य तो सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता।।धृ।।

भजनी किर्तनी
नाही रमला तो
घाम गाळूनि रे
विठू तो पावतो
नाम विठूचे सदा,घेतो मुखी सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता।।१।।

मेळा वैष्णवांचा
जमे पंढरीशी
विठू धाव घेई
सोडूनिया काशी
चोर लागले पाठी,सांगे विठू सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता।।२।।

जागा एक आहे
तुझ्यासाठी देवा
लपण्या तुला रे
फाडतो मी देहा
छाती चिरुनि देवा,लपवितो सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता।।३।।

उद्धारली कुळे
उद्धारली जात
माळियाच्या घरा
विठ्ठलाची साथ
लावे भक्तीचा लळा,माझा भोळा सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता।।४।।

धन्य अरण भूमी,
धन्य तो सावता
लाभे पुण्य आम्हां,तया हात जोडता....

©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com



Friday 14 August 2015

तिरंगा


ए बळवंत...तू केशरी घे
ए प्रज्ञाकुमारी...तू पांढरा घे
ए दगडू...तू अशोकचक्र घे
आणि हमीद...तू हिरवा घे....

चला...
वाटण्या तर झकास झाल्या
त्या त्या धर्माच्या
तिरंग्यातून निशाण्या झाल्या...

आता फडकत नाही तिरंगा
पुर्वीसारखा...मना-मनात
चाललेय चिरफाड तिरंग्याची
अगदी...अगदीच जोमात...

ध्वस्त झाले स्वातंत्र्य अन्
गुलाम झाला माणूस धर्माचा
रंग लालच दिसतोय शेवटी
त्याच्या साऱ्या कर्माचा...

ए बळवंत यार..
तू तिरंगा घे
ए प्रज्ञाकुमारी...
तू तिरंगा घे
ए दगडू...
तू तिरंगा घे
ए हमीद...
तू तिरंगा घे

नको चीरफाड...एकसंध घे
माझा तिरंगा डौलात फडकू दे!
माझा तिरंगा डौलात फडकू दे!!

*अनिल सा.राऊत
9890884228

         


Monday 10 August 2015

नाना


सिनेअभिनेते नाना पाटेकरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जो मदतीचा हात दिला आहे तो कौतूकास्पद तर आहेच पण त्यांच्या शब्दांनी त्या कुटुंबांना जी आपुलकी दिली आहे ती खरी महत्त्वाची आहे. नानांच्या कार्याचा हा शब्दगौरव....

*******  नाना  ******

आश्वासनांच्या पावसात,जीव गुदमरुन गेला
कुणब्याच्या जीवात,एक नाना श्वास भरुन गेला!

भुंकणारे ते सारे शेपटी घालून पळाले राव
धीरोदत्त हातांनी ,एक नाना रक्षा करुन गेला!

घेतला गळफास जिथे,ती झाडे आत हुंदकती
दु:खाने कासावीस,एक नाना असा रडून गेला!

जगण्या-मरण्यात आता नव्हतीच कोणती दरी
जगण्याला तयांच्या,एक नाना बळ देवून गेला!

नाहीत पुरणार आयुष्यभर जरी या मोहरा
बीज माणुसकीचे,एक नाना आज पेरुन गेला!

लावू गडे थोडा लळा,नको नुसताच कळवळा
पाषाणालाही पाझर,एक नाना बघ फोडून गेला!

*अनिल सा.राऊत*
9890884228
Email:-anandiprabhudas@gmail.com

Thursday 6 August 2015

नातीगोती


सैरभैर मी,हरवल्या साऱ्या दिशा
रोज बोलणाऱ्या तारका आज,
अनोळखी झाल्या कशा?

राखले शेत, कुंपण बनून कधी
दस्तक देणाऱ्या सुखाच्या आड,
फांजरी या आल्या कशा?

राबलो कुणासाठी,मला ना कळले
रोज राबणाऱ्या हातांच्या आज,
नसा बंद झाल्या कशा?

एवढेच माहित मज पडले गा
जीव लावणाऱ्या नात्यांनी आज ,
चोची त्या मारल्या कशा?

विव्हळतो मी, देण्या आनंद तयांना
रोज भरणाऱ्या जखमा आज,
पुन्हा रक्ताळल्या कशा?

फेकून द्या रे संपताच उपयोग
वैद्य मारणाऱ्या जमाती आज,
कळेना जन्मल्या कशा?

*अनिल सा.राऊत*
9890884228