Sunday 20 September 2015

वाढदिवस शुभेच्छा (१)


शुभेच्छा क्र.१

आले आभाळ भरुन
थेंब पावसाचे घेऊन
सरी बेभान नाचती
गाणे जन्मदिनाचे गाती...

थेंब इवले मिळून
होई सागर तो महान
तैसा सागर व्हावे तू
क्षण क्षण बहरावे तू

हसू कायम असू दे
दु:ख संकट ते नसू दे
हेच देवाशी मागणे
ना पडो तुज काही उणे

लाभो उदंड आयुष्य
आनंदी उज्ज्वल भविष्य
पूर्ण होवो साऱ्या इच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

*अनिल सा.राऊत
9890884228

anandiprabhudas@gmail.com

Sunday 6 September 2015

भक्तीचे फळ


सावता गीतमाला गीत क्र.४

भक्तीचे फळ

उरी सावताच्या ब्रम्हांड पाहिले
फूल आत्म्याचे चरणी वाहिले।।धृ।।

नाही उपास-तापास
नाही केला वनवास
ना पायी चालण्याचे कष्ट साहिले
उरी सावताच्या ब्रम्हांड पाहिले
फूल आत्म्याचे चरणी वाहिले।।१।।

नाही नवस-सायास
नाही नैवेद्याचा वास
ना पोथ्या-पुराणाचे वाचन केले
उरी सावताच्या ब्रम्हांड पाहिले
फूल आत्म्याचे चरणी वाहिले।।२।।

नाही आकांड-तांडव
नाही शोभेचा मांडव
ना जप-तपाचे हिशोब ठेविले
उरी सावताच्या ब्रम्हांड पाहिले
फूल आत्म्याचे चरणी वाहिले।।३।।

उरी वसले सावता
ना राहिले भय आता
भक्तीचे फळ मुक्तीठायी लाभले
उरी सावताच्या ब्रम्हांड पाहिले
फूल आत्म्याचे चरणी वाहिले।।४।।

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

लाख अर्पिले नाम


सावता गीतमाला गीत क्र.३

लाख अर्पिले नाम

लाख अर्पिले नाम तेव्हा देव पावला
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला।।धृ।।

थेंब थेंब घामाचा
विठ्ठलनामाचा
मातीमायच्या चरणी
अभिषेक वाहिला...
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला...१

भक्त सारे सारखे
विठू तव पारखे
सावता माळी भासला
पांडुरंगा आगळा...
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला...२

जाती कैक पंढरी
दिंड्या वारकरी
परि सावताच्या रानी
रोज चाले सोहळा...
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला...३

ना खंड कधी नामाला
भाव वाहिला कामाला
असा विरळा संत
शिरोमणी रे जाहला...
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला...४

लाख अर्पिले नाम तेव्हा देव पावला
संत सावताच्या भेटी विठ्ठल धावला.....

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Saturday 5 September 2015

राया एकदा तरी फिरुद्या मर्जी (लावणी)

(लावणी)

किती सांगा करु मी तुमची अर्जी
राया एकदा तरी फिरु द्या मर्जी...||धृ||

नजरेच्या खेळाची पुरे हो जुगलबंदी
घ्या बावनकशी ही जवानी कवळ्यामंदी
फिरुनि पुन्हा,घडू द्या गुन्हा,नको कसली नाराजी...||१||

शिणगाराची लाली गडद झाली बाई
अजून कशी का तुमची चाहुल न्हाई
पेचात पडले,काय कळेना,कशी तुम्हां करु राजी...||२||

हट्टाने मी बिलगेन तुम्हां,नका करु दूर
सोडा रुसवा,मला हसवा,लाजून मी चूर
पिरतीपायी तुमच्या राया,घालेन `ऐवज´ खर्ची...||३||

(चाल:-तुम्हांवर केली मी मर्जी बहाल ...चिञपट:-पिंजरा)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

सोळाचा खेळ (लावणी)

सोळाचा खेळ बाई मी मांडून बसले
चोळीवरनं पदर बाई मी सारुन बसले ।।धृ।।

पाखरे भिरभिरती...भान हरपती
दाणा नसल्याजागी...चोची ते मारती
असं ज्वानीचं जाळं बाई मी लावून बसले ।।१।।

भुंगे फिरफिरले...फूल फुलले
गुलकंद चाखण्या...किती टपले
भिंगरी बांधून पायी मी फिरवू लागले ।।२।।

रात सरता सरेना...मना चैन पडेना
देह तापला आगीत...भडका विझता विझेना
अशी होऊन बेभान पाणी शोधत सुटले ।।३।।

भेटले बहुजन...कोल्हे जागवून
राती परतल्या...रस चाखून
डाव टाकून उलटा मी फड जिंकून आले ।।४।।

©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

कळावी तुला प्रीत माझी

सखे सर ही पावसाची,भिजवी मनाला
कळावी तुला प्रीत माझी,अशा क्षणाला।।धृ।।

बघ डोळ्यात माझ्या
काय तुला दिसते? -M
     नको रे साजणा
     मन इथेच फसते -F
सांग ना तू मला
ही कोकाळा का गाते? -F
      बघून तुला अन् मला
      सख्याला ती पुकारते -M

जुळली मने तुझी माझी,सांग ना जगाला
कळावी तुला प्रीत माझी,अशा क्षणाला ।।१।।-M

मन चिंब झाले
तनू कोरडी का?-F
       ये जवळी साजणे
       दूर तू खडी का?-M
शहारले अंग माझे
भरली हुडहुडी का?-F
        ये मिठीत तू अशी
        घडू दे लाख चूका-M

फुलला देही अंगार कसा,सांग ना तू मला-F
कळावी तुला प्रीत माझी,अशा क्षणाला ।।२।।-M

धूंदला रे पाऊस
धुंद तू अन् मी-F
       सरावल्या धारा
       चिंब तू अन् मी-M

सख्या सर ही पावसाची,भिजवी मनाला-F
कळावी तुला प्रीत माझी,अशा क्षणाला ।।३।।-M

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

चांदण्याची रात साजणी

चांदण्याची ही रात साजणी,चल आज गाऊ प्रीतगाणी।।धृ।।-F
बहराची ही वेळ सुहानी,उमलून आली रातराणी।।धृ।।M

रात सारी आज गंधाळली
धरा दुधी साज पांघरली

मिलनाची ही वेळ सुहानी,खुणवून गेली ही पापणी।।१।।-F

चंद्र झुकला गालावरती
मीठीच्या गं खुणा उमटती

धुंदण्याची ही रात साजणी,मनी लाजते एक कामिनी।।२।।-M

श्वासात श्वास मिसळती-F
शब्द सारे ओठात विरती-M

गुंतण्याची ही रात सुहानी,सजवून गेली प्रीतगाणी।।३।।F&M
चांदण्याची..........

(कडवे स्ट्रक्चर:-सांग कधी कळणार तुला)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

कळले नाही,जडले प्रेम कसे?

हळव्या या माझ्या मनाला....साथ तुझी दे ना-M
खुलल्या या प्रेमकळीला....गंध तुझा दे ना-F

भाव मनातले सांगू कसे?
पाण्यावरती तरंग जसे
चिमटीत पाणी घेऊ कसे?
भाव शब्दात मांडू कसे?
.........कळले नाही,जडले प्रेम कसे?-M

आसमंत हा सुगंधी झाला
गंध प्रेमाचा दरवळला
का स्वप्नात मी घेई उसासे?
जागेपणी तुझी आस असे..
.........कळले नाही,जडले प्रेम कसे?

स्पर्श तुझा शहारतो अंग
भेटीतही मग भरतो रंग-M
मिठीत तुझ्या रे जादू असे
झाले तुझीच मी सांगू कसे?-F
.......कळले नाही,जडले प्रेम कसे?-F&M

(मला वेड लागले प्रेमाचे टच)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

धुंद अशा वेळी...

धुंद अशा वेळी...धुंद अशा वेळी
तुझी आठवण मज यावी
त्या क्षणी भेटीस तू ये ना...
हवा पावसाळी
भिजवत सुमनांना यावी
त्या क्षणी मिठीत तू ये ना...M

पडता थेंब देही
बावरे मन होई
ध्यास हा तुझा
    लागतो उगी का कळेना?...F

धुंद अशा वेळी..........M

ओढ मिलनाची
थकल्या नयनांची
पायघड्या केल्या
सखे नजरेच्या.....M

माझ्या अंतरीची
स्पंदने ह्रुदयाची
तेजीत ओढीने
तुझ्याच भेटीच्या.....F

सांगू जरा ओल्या मीठीला
भिजुनि जावी मने.....M

सूर नवे जुळवूनी रोज
गावू प्रेमाचे गाणे.....F

धुंद अशा वेळी........M

(चाल:-ओल्या सांजवेळी)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

पोवाडा

पोवाडा

अत्याचाराच्या अंध:कारात,काळोखाला चिरण्याला
      सूर्य जन्मला...सूर्य जन्मला
रामजी भिमाईच्यासाठी
घडली गोष्ट एक मोठी
चौदावे रत्न आले पोटी-हां जी जी

नव्हता माणूस म्हणत माणसाला
शिवाशिवीने कहर केलेला
      लाज वाटावी त्या पशूला
असा वागवत होता माणूस माणसाला
कराया उद्धार तयांचा भिमराव जन्मला...
         भिमराव जन्मला-हां जी जी

अडाणीच होता समाज ठेविला
थोडे बहू जे शिकले,बसून ओसरीला
     तयांनीही मुरडली नाके समाजाला
भिमरावांनी घेतला वसा नाही टाकिला
केले प्राशन म्हणुनी वाघिणीच्या दुधाला...
      वाघिणीच्या दुधाला-हां जी जी

किर्ती अशी कर्तृत्त्वाने झळाळली
         चमकली ज्ञानाने
मग संबोधु लागला समाज
         बाबासाहेब नावाने
कौतुक किती ते लोकां
          माझे बाबा...माझे बाबा
फेकले देव देव्हाऱ्यातुनी
         बसविले त्या जागी बाबा
शिकलेल्या बाबांनी तयांना
        सांगितले मग पटवून-२
शिक्षणाने माणूस होतो
     शहाणा की रे,व्हा शहाणे शिकून-२

अन्यायाला फोडली वाचा
अस्पृश्यतेला धिक्कारले
अज्ञानाची फोडली कोंडी
सर्वांबरोबर शिक्षण केले...

शिक्षणाची दारे खुली झाली आणि काय चमत्कार झाला...(बोल)

एका हाकेला,साथ बाबाला-२
      समाज एकवटला
      निर्धार केला...
अरे चला शिकायला
साथ द्याया बाबाला
अन् लाथ पेकटात व्यवस्थेच्या घालायला-हां जी जी

दुखले किती जरी पोटात
   नाही माघारी,शिक्षणाच्या दारी
बघून जोश तो अस्पृश्यांचा
   होई तीळपापड उच्चवर्णियांचा
अन् शिकुनि शहाणा होई तो अनुयायी बाबांचा-हां हां

पाण्यासारखे निर्मळ कोणी
जगात नाही,वादच नाही
परि पाण्यालाही केले तयांनी पापी
म्हणे शिवाशिवीने देव तयांचा कोपी
हा भेद पाहुनी का देवही गेले झोपी....हा जी हा जी

चिडला तो ज्ञानसूर्य अन्
दिली हाक समतेची
समाजाच्या एकतेची
अस्पृश्यांच्या उद्धाराची

ऐतिहासिक निर्णय बाबांनी घेतला
पाण्याला त्या हस्तस्पर्श केला
अन् पवित्र केले त्या पापी पाण्याला
केले अमर महाडच्या त्या चवदार तळ्याला-हां जी जी

वाढवित होते ज्ञानाला
चेतवित होते मरगळलेल्या मनाला
अजून सल एक होती त्या क्षणाला
शिका,संघटित व्हा
     करा संघर्षाला
जन्म दिला ब्रीदवाक्याला
अंगार मना-मनात चेतला
अत्याचाराविरुद्ध सारा समाज पेटला-हां जी जी

तुटल्या साऱ्या बेड्या
शतकानुशतकाच्या गुलामीच्या
घेतला श्वास मोकळा
फुगल्या बरगड्या छातीच्या-हो-हो
जोखड मानेचे गळून पडता,ताठा कण्याला
अन् काय बिशाद कुणाची भिडवाया डोळा डोळ्याला-२

सोसले हाल खूप झाले
नाही आता रमले
मन बाबांचे,ज्या धर्माने दुखावले
मार्ग तो सापडला
अन् गेले शरण गौतमाला...हां जी जी

भारत जेव्हा स्वतंत्र झाला
दिला जन्म बाबांनी घटनेला
देवून मागासांना हक्काचे आरक्षण
झाले बाबांचे महापरिनिर्वाण...

समाजहितासाठी समता,न्याय,बंधुता त्रिसूत्री जोपासावी
ज्ञानसूर्याची स्वप्ने आता,तुम्ही पूर्ण करावी

चैत्यभूमीला त्या वंदन करुनि मनोभावे-२
अनिल लिहीतो पोवाड्याला,तुम्ही स्मरणाने गावे-२

(आधार:-तुळापुरी कैद झाला...)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

Tuesday 1 September 2015

पाऊस सोहळा


गूज पक्षांची कानी
पाय रानात रुतला
सूर कोकिळा प्याली
कंठ झाडाला फुटला

गाज वाऱ्याची पानी
झुला खोप्याचा झुलला
माय दिसता क्षणी
बंध चोचीचा खुलला

साज फुलांचा रानी
गंध मातीला सुटला
जीव लावूनि त्यासी
रस भ्रमरे लुटला

गातो ओहोळ गाणी
रंग मोरांनी भरला
नभ वाकता खाली
ठेका सरींनी धरला

भासे बिल्लोरी पाणी
सूर्य तळ्यात दंगतो
असा सोहळा भारी
नित्य नव्याने रंगतो!

©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

मिरुग

       
गड गड गडगड
काळे मेघ गर्जती
घण् घण् घणघण
घंटा शाळेची वाजती

दप्तर पाठी घेऊनी
धूम ठोकली तोऱ्यात
पाऊस धावे शिवाया
धूळ चालली डोळ्यात

पळता पळता बाई
दम लागला उरात
नजर धावली मागे
ठेच लागली जोरात

तोल जाता आपटले
थेंब धावले जोमात
पाठशिवणीचा खेळ
चालला बाई झोकात

आला आला पाऊस
भिजले सारे दफ्तर
काट्यात फसुनि झाले
गणवेशाचे लक्तर

वाटेला लावून डोळे
माय उभी दारात
चिंब भिजले मी अन्
पाणी गळे छपरात

कुशीत घेऊनि माय
बोलली मजला काही
हात जोडूनि आभाळा
`मिरुग' पावला बाई!

©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com