Wednesday 30 March 2016

रातराणी


::::::: रातराणी :::::::

सांज ढळता ढळता
रोज नवीच कहाणी
होते तरुण कलिका
गाते सुगंधाची गाणी!

किती लाजाळू लाजाळू
गर्द अंधाराची राणी
साद घालण्या साजणा
शृंगारते रानी वनी!

भाळी गोंदन गोंदन
ओल्या दवाचे रेखुनी
गंधाळल्या गोंदावरी
शोभे कुंकूम चांदणी!

लागे चाहूल चाहूल
वाजे पाऊल रे कानी
होता जाणिव भासाची
दाटे नयनात पाणी!

अंगी शहारा शहारा
उठे नित्य स्पर्शातुनी
वाहते अनिलासवे
तिची अधूरी कहानी!

किती विरह विरह
सोसावा रोज दिनी
सखे,तरी पुन्हा पुन्हा
उमलते रातराणी!

        ✒अनिल सा.राऊत
              📱9890884228

Tuesday 29 March 2016

भिंती


::::: भिंती :::::

थोडा
मी ही घेतलाय विसावा
तेव्हा...याच वृद्धाश्रमात!
.
.
आज
आलाय वाट्याला
कायमचा मुक्काम...याच वृद्धाश्रमात!
.....तेव्हा,
मी पुसले नव्हते अश्रू
बापाच्या डोळ्यातले...
आणि
कळली ही नव्हती वेदना
बाप असण्याची!
.
.
आज,
हिशोब पूर्ण झालाय...
मात्र,
उद्या?
उद्या ढासळायला हव्यात
या वृद्धाश्रमाच्या भिंती!
...माझ्यातल्या बापाचे
काळीज बोलतेय असे...
.
.
कदाचित,
माझ्याही बापाचे काळीज
असेच बोलले असेल..
पण,
कुठे ऐकले या भिंतींनी?

       ✒अनिल सा.राऊत
         📱9890884228

आठवणी


:::::: आठवणी :::::

रुततात
आठवणी जेव्हा
काळजात...
मी
वेचून वेचून
काढतो
सलणाऱ्या आठवणी!
पण,
उरलेल्या आठवणी तरी
कुठे असतात
मुलायम?


           ✒अनिल सा.राऊत
             📱9890884228

चारच क्षण


:::: चारच क्षण :::

तुझ्या भेटीचे
चारच क्षण
आले वाट्याला...

दोन क्षणांनी
लावली ओढ
माझ्या जीवाला...

दोन क्षणांचे
टिश्यूकल्चर
केले मुद्दाम...
हो..पुनर्जन्म
व्हावा म्हणून
आठवणींचा!

✒ अनिल सा.राऊत
📱9890884228

Friday 25 March 2016

येडीखुळी झाली पोरं सखुबायच्या नादानं!


::::: येडीखुळी झाली पोरं सखुबायच्या नादानं :::::


वाजव रं डीजे जरा वाजव रं जोमानं
येडीखुळी झाली पोरं सखुबायच्या नादानं।।धृ।।

नागिणीवाणी चाल तिची गोरं गोरं गाल
कातळ काया करी दिलाचं रं हाल
मागं मागं फिरुनि जीव झाला हैराण।।१।।

बघून तिला काळीज लागतंय झुरायला
गल्लीभवती पोरं फिरती लाईन मारायला
कडक पहारा तिच्यावरती ठेवलाय बापानं।।२।।

आयन्याम्होरी उभी राहुनि करी खाणाखुणा
नादी तिच्या लागता हाती येई तुणतुणा
तिच्यापायी जमीन सारी फुकली म्हादानं।।३।।

आस लावुनि फासा टाकुनि दमले गाव
जवानीचे फूल तोडण्या रंक झाले राव
बाईल येडे मजनू गेले बाराच्या भावानं।।४।।

नजरेचा तीर तिच्या लागावा जिव्हारी
म्हणूनि गाव सारे,धावा करी श्रीहरी
काकड आरतीला गाती प्रेमाचंच गाणं।।५।।

        ©अनिल सा.राऊत
            📱9890884228

अभंग-सज्जनाला जाच लाजण्याचा


:::::::: अभंग-सज्जनाला जाच लाजण्याचा ::::::::

झाले भोंदू फार । साहित्य मंदिरी
गर्व तो अंतरी । फुकाचा रे ।।१।।

चार दोन शब्द । होताच प्रसन्न
लेखिती कदान्न । गुरुलाही ।।२।।

माज ऐसा कधी । नको दाखवाया
गेले कैक वाया । गुर्मीत या ।।३।।

अपुलेच हात । घेई पाठीवरी
थोपटण्या बरी । पडते रे ।।४।।

शेणावरी गोटे । न टाकी शहाणे
ते बुजगावणे । ऐटखाऊ ।।५।।

उथळ बाजारी । नागव्यांचा नाच
सज्जनाला जाच । लाजण्याचा ।।६।।

काय चाळे प्रभो । दावतो आम्हांशी
नाते माकडांशी । लालेलाल ।।७।।

      ✒अनिल सा.राऊत
         📱9890884228

Wednesday 23 March 2016

सालीची होली (हास्यकविता)


सालीची होली (हास्यकविता)

साली माझी आली
लय लय लाडात
वाटलं बिचाऱ्या मनाला
घ्यावं हिला घोळात...

बायकोही तशी 
काही वाईट नाही
पण सालीसारखी
सॉलिड टाईट नाही...

जे जवळ नसतं
तेच मनाला हवं असतं
सालीच्या मनातलं मात्र
कधीच कळत नसतं...

कधी करते म्याव म्याव
तर कधी क्वाय क्वाय
पण म्हणाली काल खरी
उद्या करुया होली एन्जॉय...

आज येतानाच ती
आली होती रंगून
तिला पाहून दिल
गेलं माझं हरकून...

तिच्या सौंदर्याचा
भयानक असर पडला
माझ्याच बायकोचा
मला विसर पडला...

बहाणा करुन रंगाचा
आवळून तिला धरलं
नाव सालीचं घेऊन
आय लव यू म्हटलं...

रंगात रंगलेलं थोबाड
ओळखू नाही आलं
बायकोनं लागलीच
थोबाड माझं रंगवलं...

दूर उभी राहून साली
करत होती बाय बाय
आता पुढच्या वर्षीही
करुया होली एन्जॉय..!

      ✒अनिल सा.राऊत
       📱9890884228

Thursday 17 March 2016

.........तेव्हाही अन् आताही!


:::::::: .........तेव्हाही अन् आताही! :::::::

मी न माझा राहिलो कधी
.........तेव्हाही अन् आताही!

बोलते ओठांनी,भेटते नयनांनी
.........तेव्हाही अन् आताही!

सत्यात टाळते,स्वप्नात छळते
.........तेव्हाही अन् आताही!

कारणे लाख परत फिरण्यासाठी
.........तेव्हाही अन् आताही!

हातात गंध बघ प्रेमाचा उरलेला
.........तेव्हाही अन् आताही!

मी सैरभैर दाही दिशांचा प्रवाशी
.........तेव्हाही अन् आताही!

तू मस्त मजेतली स्वच्छंद मैना
.........तेव्हाही अन् आताही!

        ✒अनिल सा.राऊत
         📱9890884228

अभंग


:::::::: अभंग :::::::

तुझा अभिषेक । नाहीच थांबला
नाहीच लांबला । युगे युगे ।।१।।

पाठी-पोटाची रे । करुन चिपळी
तुझिच भूपाळी । गातो रंक ।।२।।

उदासला वारा । रुसले आभाळ
पुजला दुष्काळ । पाचवीला ।।३।।

संकटे धाडूनि । निवारती तेच
मतांसाठी पेच । नीच सारे ।।४।।

तसाच तुझा रे । दिसे मज कावा
भक्तांसाठी पावा । गाजराचा ।।५।।

औंदा तरी जाग । थोडा तरी लाज
घुमू दे आवाज । पावसाचा ।।६।।

दुथडी न्हावू दे । धरणी धरण
गाईन भजन । तेव्हाच रे ।।७।।

           ✒अनिल सा.राऊत
            📱9890884228

Tuesday 15 March 2016

लावणी-मिठीत की हो वढलं


::::::: लावणी-मिठीत की हो वढलं :::::::

काल राती आकरीत घडलं
नगं नगं ते सपान पडलं
अहो राया तुमी
खस्सकन मिठीत की हो वढलं।।धृ।।

नाच नाचुनि..दमुनि भागूनि झोपले होते गाढ
कडी घालण्या उठले इत्क्यात आला तुम्ही द्वाड
बाह्या सारुन..डोळा मारुन
गप्पकन दार की हो लावलं...।।१।।

गालात हसुनि..तालात बसुनि डाव असा टाकला
लाजून तुम्हा बाई हा मुखडा चांदाचा झाकला
गिराण सुटण्या...चंद्र देखण्या
झप्पकन हात की हो धरलं..।।२।।

डोळ्यात बघुनि..हुरद्यात शिरुनि राजी केलं मला
कुठून कशी वं सांगा राया अवगत केली कला
काळीज देऊन..काळीज घेऊन
टच्चकन डाळिंब की हो फोडलं।।३।।

लाज लाजूनि...चूर होऊनि मोहरुन गेले बाई
लव अंगावरी ऊभी राहिली शहारुन गेले बाई
ढग बरसुनि..गेले निघूनि
लख्खकन चांदणं की हो पडलं..।।४।।

          ©अनिल सा.राऊत
          📱9890884228

Thursday 10 March 2016

लावणी-जीव टांगणी लावू नका



%%%% लावणी-जीव टांगणी लावू नका %%%%
____________________________
ऐन सांजेची वेळ...ऊरात उठली कळ
ह्ये दुखणं हाय भारी
हलक्यावरी घेऊ नका...
जीव टांगणी लावू नका
सख्या,या ना उशीर लावू नका।।धृ।।

नऊवारी साडी नेसून भारी
ऊभी केव्हाची बाई मी दारी
शृंगार सारा जाईल वाया
उगीच भाव खाऊ नका...
जीव टांगणी लावू नका
सख्या,या ना उशीर लावू नका।।१।।

अंबाड्यावर चढविला गजरा
कुणा-कुणाच्या रोखू नजरा
जीव जडला तुम्हावरी
तोंड फिरवूनि जाऊ नका...
जीव टांगणी लावू नका
सख्या,या ना उशीर लावू नका।।२।।

शेज सजवली जाई जुईनी
या सत्वरी घाई करुनी
अंग अंग मोहरुन येता
अंत ज्वानीचा पाहू नका...
जीव टांगणी लावू नका
सख्या,या ना उशीर लावू नका।।३।।

       ©अनिल सा.राऊत
       📱 9890884228

अभंग

::::::::/:::: अभंग ::::/:::::::

ये आता तू दारी।मागावया दाणे
घाल लोटांगणे।सरकारा।।

पिकविले आम्ही।पोटापुरते या
नको पडू पाया।द्या म्हणूनि।।

भाव बारा आणे।होता दिला जेव्हा
दात कण्या तेव्हा।केल्या आम्ही।।

कुणी लटकले।कुणी विष प्याले
नाही आली दया।तेव्हाच का।।

आज दुष्काळाने।घडवली एकी
मिटवली बेकी।सालासाठी।।

उजाड ही राने।सारीच आता रे
पोट भुकेले रे।सुटलेले।।

सांग आता तया।माग दारी भीक
फॅक्टरी ती विक।दाण्यापायी।।

वाटा कैक हाती।धोरण पांगळे
डसती मुंगळे।आयातीचे।।

पोटचे मरु दे।जगो सवतीचे
तख्त हे सत्तेचे।नको जाया।।

          ✒ अनिल सा.राऊत
           📱9890884228