::::::: लावणी-मिठीत की हो वढलं :::::::
काल राती आकरीत घडलं
नगं नगं ते सपान पडलं
अहो राया तुमी
खस्सकन मिठीत की हो वढलं।।धृ।।
नाच नाचुनि..दमुनि भागूनि झोपले होते गाढ
कडी घालण्या उठले इत्क्यात आला तुम्ही द्वाड
बाह्या सारुन..डोळा मारुन
गप्पकन दार की हो लावलं...।।१।।
गालात हसुनि..तालात बसुनि डाव असा टाकला
लाजून तुम्हा बाई हा मुखडा चांदाचा झाकला
गिराण सुटण्या...चंद्र देखण्या
झप्पकन हात की हो धरलं..।।२।।
डोळ्यात बघुनि..हुरद्यात शिरुनि राजी केलं मला
कुठून कशी वं सांगा राया अवगत केली कला
काळीज देऊन..काळीज घेऊन
टच्चकन डाळिंब की हो फोडलं।।३।।
लाज लाजूनि...चूर होऊनि मोहरुन गेले बाई
लव अंगावरी ऊभी राहिली शहारुन गेले बाई
ढग बरसुनि..गेले निघूनि
लख्खकन चांदणं की हो पडलं..।।४।।
©अनिल सा.राऊत
📱9890884228
No comments:
Post a Comment