Thursday, 10 March 2016

अभंग

::::::::/:::: अभंग ::::/:::::::

ये आता तू दारी।मागावया दाणे
घाल लोटांगणे।सरकारा।।

पिकविले आम्ही।पोटापुरते या
नको पडू पाया।द्या म्हणूनि।।

भाव बारा आणे।होता दिला जेव्हा
दात कण्या तेव्हा।केल्या आम्ही।।

कुणी लटकले।कुणी विष प्याले
नाही आली दया।तेव्हाच का।।

आज दुष्काळाने।घडवली एकी
मिटवली बेकी।सालासाठी।।

उजाड ही राने।सारीच आता रे
पोट भुकेले रे।सुटलेले।।

सांग आता तया।माग दारी भीक
फॅक्टरी ती विक।दाण्यापायी।।

वाटा कैक हाती।धोरण पांगळे
डसती मुंगळे।आयातीचे।।

पोटचे मरु दे।जगो सवतीचे
तख्त हे सत्तेचे।नको जाया।।

          ✒ अनिल सा.राऊत
           📱9890884228

No comments:

Post a Comment