Monday 12 October 2015

किती खाल्ल्या असतील खस्ता


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

::::::: किती खाल्ल्या असतील खस्ता ::::::::

सांगत्ये तुम्हाला बाई
आता तुमचं मी ऐकत नाही
जन्म दिला तुम्हां ज्यांनी
त्यांना मी बोझ्या मानत नाही
अन्
आधार त्यांचा तोडत नाही...
जी..जी..जीजी..जी -Female

आता कसं तुला समजावु
सांग कुठवर मी गं धावू
पगार काही वाढत नाही,
         खर्च त्यांचा झेपत नाही...
गं..गं..गंगं..गं-Male

आता तुमचं मी ऐकत नाही,
आधार त्यांचा तोडत नाही...
जी..जी..जीजी..जी -Female

किती खाल्ल्या असतील खस्ता
जन्मापासुनि वाढवत असता
गणित असलं पटत नाही,
आता तुमचं मी ऐकत नाही...
नाही..नाही..नाही-Female

चिमण्या पिलांसाठी अपुल्या
टाचा बघ किती झिजल्या
तुम्हांसाठीच धावत राही,
रात रात मी झोपत नाही...
गं..गं..गंगं..गं-Male

आता तुमचं मी ऐकत नाही,
आधार त्यांचा तोडत नाही...
जी..जी..जीजी..जी -Female

सारं आयुष्य त्यांनी झिजवलं
तरी तुम्ही दारात बसवलं
ही फेड कुणाला चुकत नाही,
आता तुमचं मी ऐकत नाही...
नाही..नाही..नाही-Female

किती हुशार तू गं राणी
आलं डोळ्यात माझ्या पाणी
हाल त्यांचं बघवत नाही,
जन्मदात्यांना विसरत नाही...
गं..गं..गंगं..गं-Male

आता तुमचं मी मोडत नाही,
साथ तुमची सोडत नाही...
जी..जी..जीजी..जी -Female

जन्म दिला मला ज्यांनी
त्यांना मी बोझ्या मानत नाही...-Male

सांगत्ये तुम्हाला बाई
साथ तुमची सोडत नाही...
साथ तुमची सोडत नाही...-Female

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अनिल सा.राऊत
9890884228

anandiprabhudas@gmail.com

दे ललकारी


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

::::::: दे ललकारी ::::::::

भेदिले अवकाश,लांघिले सागर
नाही राहिली तू अबला...
गिरीशिखरावरती पाय रोवूनि
दे ललकारी या जगाला..।।धृ।।

खांद्याला खांदा लावूनि
डोळ्याला डोळा भिडवूनि
         शूराने रक्षिते सीमेला..।।१।।

चूल आणि मूल सोडूनि
सारी बंधने झूगारुनि
         ठोकरले तू गुलामीला..।।२।।

बुद्धीचा कस लावूनि
पुरुषांना फिके पाडूनि
         दिलास धक्का वर्चस्वाला..।।३।।

कुणी कल्पना होऊनि
आकाशी झेप घेऊनि
         फडकावते तिरंग्याला..।।४।।

समानता ही जाणूनि
साथ मी तुला देऊनि
         सलाम करतो यशाला..।।५।।

कर्तृत्त्वाला मान देऊनि
शौर्याची जाण ठेऊनि
         अभिमान तुझा देशाला..।।६।।

भेदिले अवकाश,लांघिले सागर
नाही राहिली तू अबला...
गिरीशिखरावरती पाय रोवूनि
दे ललकारी या जगाला..

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अनिल सा.राऊत
9890884228

anandiprabhudas@gmail.com

Saturday 10 October 2015

तेवते एक पणती


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

::::: तेवते एक पणती :::

सूर्य जरी तुज हाती,अंधार दाटतो पाठी...
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी।।धृ।।

असेल जरी अंशाचा,दिवा तुझ्या वंशाचा
नाग जहरी दंशाचा,फणा काढुनि तुझ्यापाठी।।१।।
तेवतेे एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी...

सोसले किती तू हाल,केला उभा महाल
झालास तू रखवाल,अपुल्याच घरासाठी।।२।।
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी...

का करितो हव्यास,मनी मुलाचा ध्यास
गर्भात मुलीचा -हास,सांग करितो कशासाठी।।३।।
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी...

खुडू नको कळीला,जन्म घेऊ दे मुलीला
देह सासरी वाहिला,जीव तुटतो बापासाठी।।४।।
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी...

सोसते रे सारे काही,तुझ्याच नावापायी
तरी तुला तमा नाही,कोण सोसतो कुणासाठी।।५।।
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी...

घे सतीचे वाण हाती,भाळी लावून माती
वाढू दे हरेक पोटी,एक मुलगी देशासाठी।।६।।
तेवते एक पणती,लेक होऊनि तुझ्यासाठी.....

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अनिल सा.राऊत
9890884228

anandiprabhudas@gmail.com

Friday 9 October 2015

देव माझा अरणमंदिरी


सावता गीतमाला गीत क्र.६

:::: देव माझा अरणमंदिरी :::::

आहे देव माझा अरणमंदिरी
बोला हरी हरी...बोला हरी हरी।।धृ।।

टाळ चिपळ्यांचा भजनि गजर
भक्तांवरी त्याची कृपेची नजर
देई अभय,नाव लावे किनारी...।।१।।

कष्टाचिया गावा नामात दंगता
धावे विठोबा,सांगे संत सावता
अरणक्षेत्री वसे दुजी पंढरी...।।२।।

मनोभावे माथा ठेवितो चरणी
संताचाही संत,झाला शिरोमणी
पंढरीनाथ करी अरण वारी...।।३।।

आहे देव माझा अरणमंदिरी
बोला हरी हरी...बोला हरी हरी....
©अनिल सा.राऊत
9890884228

धाव धाव सावता...


सावता गीतमाला गीत क्र.५

:::: धाव धाव सावता :::::

धाव धाव सावता....धाव धाव सावता
संकटांनी आता पुरा घेरलो।।धृ।।

तुझ्या कृपेची सावली
असू दे सदा माऊली
नको रे दु:खाची छाया
असू दे सुखाची माया...
         असू दे सुखाची माया
तुझ्या चरणाचा दास जाहलो।।१।।

कुणी बोलते टाकून
कुणी सोडतो दावण
झाला डोंगर दु:खाचा
घास मुकला सुखाचा...
         घास मुकला सुखाचा
किती धरु धीर मी रे हरलो।।२।।

फूले करितो घामाची
माला ओवितो नामाची
तरी का देवा पावेना
ठाव जीवा या लागेना...
         ठाव जीवा या लागेना
सांग कुठे देवा कमी पडलो।।३।।

वाढे श्वासाचे अंतर
आस तरी निरंतर
ये ना मज भेटायला
जसा तुज विठू आला...
         जसा तुज विठू आला
भेट तुझी घेण्या जगी उरलो।।४।।

धाव धाव सावता....धाव धाव सावता
संकटांनी आता पुरा घेरलो....

©अनिल सा.राऊत
9890884228

Thursday 8 October 2015

लाडाच्या मैने...


लावणी 

हौशी माझी बया,तिला नेलं फिराया
बघून तिची काया,भरला जादा किराया
तरी टांगा काय हलंना,
बसला तिथंच फसुनि जी जीजी जी
टांगंवाला गेला हसुनि
अन्
मैना माझी बसली की हो रुसुनि...हो होहो हो...

आगं आगं बायने,लाडाच्या मैने
काय आपरुक तुला गं टांग्याचं...
चारीन माझ्या हातचं 
         तुला भरीत रोज वांग्याचं।।धृ।।

चालत थोडं जाऊया
सिलमा दौड पाहुया
दुखलं पाय जरी
गेल्यावर घरी
चोळीन मोठ्या पिरमानं
         लावून तेल माक्याचं।।१।।

अशी नकं रुसू गं
हटकून बसू गं
बाईल त्याची देखणी
पुरवतो लाड म्हणूनि
नकं सांगूस तू
         कौतुक मला त्या चांग्याचं।।२।।

ऐक माझं थोडं
हेका तुझा सोड
येळ चालली निघून
कानात ठेवतो सांगून
घेईन तुला हावसंनं
         घड्याळ मोठ्या ठोक्याचं।।३।।

गुणाची माझी मैना
रुसवा आता गं सोडना
घे पावडर लाली आयना
रुप तुझं गं डोळ्यात मायना
असंच चितार येऊ दे पोटी
         साल हाय लय मोक्याचं।।४।।

आगं आगं बायने,लाडाच्या मैने
काय आपरुक तुला गं टांग्याचं...
चारीन माझ्या हातचं 
         तुला भरीत रोज वांग्याचं.....

*अनिल सा.राऊत*
9890884228

Friday 2 October 2015

आठवण

::::::: आठवण :::::::

ये गं ये गं साजणे...ये गं ये गं साजणे
आठवण तुझी जीव घेतेया।।धृ।।

मन बेचैन बेचैन
कुठे पडेना चैन
सैरभैर झाला जीव
वाट पाहती नयन
तुझ्या वाटेवरी फूले वाहतोया।।१।।

किती करशी बनाव
काय तुला म्हणावं
किती छळशिल आता
कशी येईना कणव...
माझ्या श्वासाची दोर तुटतेया।।२।।

घेतो मिटुनि पापणी
नको वहावया पाणी
प्रेमाची गं त्या अपुल्या
सांग जगाला कहाणी
नको रडू आता वेळ गेलिया।।३।।

ये गं ये गं साजणे...ये गं ये गं साजणे
आठवण तुझी जीव घेतेया....

*अनिल सा.राऊत* 9890884228