लावणी
हौशी माझी बया,तिला नेलं फिराया
बघून तिची काया,भरला जादा किराया
तरी टांगा काय हलंना,
बसला तिथंच फसुनि जी जीजी जी
टांगंवाला गेला हसुनि
अन्
मैना माझी बसली की हो रुसुनि...हो होहो हो...
आगं आगं बायने,लाडाच्या मैने
काय आपरुक तुला गं टांग्याचं...
चारीन माझ्या हातचं
तुला भरीत रोज वांग्याचं।।धृ।।
चालत थोडं जाऊया
सिलमा दौड पाहुया
दुखलं पाय जरी
गेल्यावर घरी
चोळीन मोठ्या पिरमानं
लावून तेल माक्याचं।।१।।
अशी नकं रुसू गं
हटकून बसू गं
बाईल त्याची देखणी
पुरवतो लाड म्हणूनि
नकं सांगूस तू
कौतुक मला त्या चांग्याचं।।२।।
ऐक माझं थोडं
हेका तुझा सोड
येळ चालली निघून
कानात ठेवतो सांगून
घेईन तुला हावसंनं
घड्याळ मोठ्या ठोक्याचं।।३।।
गुणाची माझी मैना
रुसवा आता गं सोडना
घे पावडर लाली आयना
रुप तुझं गं डोळ्यात मायना
असंच चितार येऊ दे पोटी
साल हाय लय मोक्याचं।।४।।
आगं आगं बायने,लाडाच्या मैने
काय आपरुक तुला गं टांग्याचं...
चारीन माझ्या हातचं
तुला भरीत रोज वांग्याचं.....
*अनिल सा.राऊत*
9890884228
No comments:
Post a Comment