Saturday, 5 September 2015

पोवाडा

पोवाडा

अत्याचाराच्या अंध:कारात,काळोखाला चिरण्याला
      सूर्य जन्मला...सूर्य जन्मला
रामजी भिमाईच्यासाठी
घडली गोष्ट एक मोठी
चौदावे रत्न आले पोटी-हां जी जी

नव्हता माणूस म्हणत माणसाला
शिवाशिवीने कहर केलेला
      लाज वाटावी त्या पशूला
असा वागवत होता माणूस माणसाला
कराया उद्धार तयांचा भिमराव जन्मला...
         भिमराव जन्मला-हां जी जी

अडाणीच होता समाज ठेविला
थोडे बहू जे शिकले,बसून ओसरीला
     तयांनीही मुरडली नाके समाजाला
भिमरावांनी घेतला वसा नाही टाकिला
केले प्राशन म्हणुनी वाघिणीच्या दुधाला...
      वाघिणीच्या दुधाला-हां जी जी

किर्ती अशी कर्तृत्त्वाने झळाळली
         चमकली ज्ञानाने
मग संबोधु लागला समाज
         बाबासाहेब नावाने
कौतुक किती ते लोकां
          माझे बाबा...माझे बाबा
फेकले देव देव्हाऱ्यातुनी
         बसविले त्या जागी बाबा
शिकलेल्या बाबांनी तयांना
        सांगितले मग पटवून-२
शिक्षणाने माणूस होतो
     शहाणा की रे,व्हा शहाणे शिकून-२

अन्यायाला फोडली वाचा
अस्पृश्यतेला धिक्कारले
अज्ञानाची फोडली कोंडी
सर्वांबरोबर शिक्षण केले...

शिक्षणाची दारे खुली झाली आणि काय चमत्कार झाला...(बोल)

एका हाकेला,साथ बाबाला-२
      समाज एकवटला
      निर्धार केला...
अरे चला शिकायला
साथ द्याया बाबाला
अन् लाथ पेकटात व्यवस्थेच्या घालायला-हां जी जी

दुखले किती जरी पोटात
   नाही माघारी,शिक्षणाच्या दारी
बघून जोश तो अस्पृश्यांचा
   होई तीळपापड उच्चवर्णियांचा
अन् शिकुनि शहाणा होई तो अनुयायी बाबांचा-हां हां

पाण्यासारखे निर्मळ कोणी
जगात नाही,वादच नाही
परि पाण्यालाही केले तयांनी पापी
म्हणे शिवाशिवीने देव तयांचा कोपी
हा भेद पाहुनी का देवही गेले झोपी....हा जी हा जी

चिडला तो ज्ञानसूर्य अन्
दिली हाक समतेची
समाजाच्या एकतेची
अस्पृश्यांच्या उद्धाराची

ऐतिहासिक निर्णय बाबांनी घेतला
पाण्याला त्या हस्तस्पर्श केला
अन् पवित्र केले त्या पापी पाण्याला
केले अमर महाडच्या त्या चवदार तळ्याला-हां जी जी

वाढवित होते ज्ञानाला
चेतवित होते मरगळलेल्या मनाला
अजून सल एक होती त्या क्षणाला
शिका,संघटित व्हा
     करा संघर्षाला
जन्म दिला ब्रीदवाक्याला
अंगार मना-मनात चेतला
अत्याचाराविरुद्ध सारा समाज पेटला-हां जी जी

तुटल्या साऱ्या बेड्या
शतकानुशतकाच्या गुलामीच्या
घेतला श्वास मोकळा
फुगल्या बरगड्या छातीच्या-हो-हो
जोखड मानेचे गळून पडता,ताठा कण्याला
अन् काय बिशाद कुणाची भिडवाया डोळा डोळ्याला-२

सोसले हाल खूप झाले
नाही आता रमले
मन बाबांचे,ज्या धर्माने दुखावले
मार्ग तो सापडला
अन् गेले शरण गौतमाला...हां जी जी

भारत जेव्हा स्वतंत्र झाला
दिला जन्म बाबांनी घटनेला
देवून मागासांना हक्काचे आरक्षण
झाले बाबांचे महापरिनिर्वाण...

समाजहितासाठी समता,न्याय,बंधुता त्रिसूत्री जोपासावी
ज्ञानसूर्याची स्वप्ने आता,तुम्ही पूर्ण करावी

चैत्यभूमीला त्या वंदन करुनि मनोभावे-२
अनिल लिहीतो पोवाड्याला,तुम्ही स्मरणाने गावे-२

(आधार:-तुळापुरी कैद झाला...)

©अनिल सा.राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com

No comments:

Post a Comment