(सावता गीतमाला गीत क्र.२)
....झाला पावन सावता!
नको नको विसरु आता, माळियाच्या या भक्ता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।धृ।।
गातो विठ्ठलाची गाणी,हात राबता राबता
टाळ चिपळ्याची साथ,देई गुणी रे पावटा
आत डोलतो विठ्ठल,वारा शीळ रे घालता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।१।।
दिंडी मोटेची निघाली,दिस फाकता फाकता
तरारला कांदा-मुळा,वारी पाण्याची पोचता
झाला वेडापिसा देव,असा सोहळा पाहता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।२।।
झाले मंदिर शेताचे,पीक जोजता जोजता
धाटा-धाटापरि उभा,विठू भक्ताच्या स्वागता
सेवा मातीची करुनि,तिथे टेकावा माथा
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।३।।
भाव-भक्तीच्या नादात,किती चालता चालता
देव पाहावा रानात,घाम मातीत गाळता
अशी पुण्याई सांगते,माझ्या अरणची गाथा
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता।।४।।
नको नको विसरु आता, माळियाच्या या भक्ता
देव बैसला अंतरी,झाला पावन सावता....
©अनिल सा. राऊत
9890884228
anandiprabhudas@gmail.com
No comments:
Post a Comment