Sunday, 17 January 2016

कातरवेळ

:÷:÷:÷:÷:÷ ....कातरवेळ :÷:÷:÷:÷:
....................................................

दिले वचन येण्याचे
उलटून जाते वेळ
तिच्या प्रतीक्षेत अशी
सरते कातरवेळ...

येते जेव्हा लवकरी
अबोल्याचा चाले खेळ
ओठांतुनी अलगद
झरते कातरवेळ...!


डोळे उभे वाटेवरी
माय येण्याची ही वेळ
ना दिसता...जीवघेणी
ठरते कातरवेळ...

सूर्य झिरपता रानी
लागे भाकरीचा मेळ
माय होते ओली ओली
भिजते कातरवेळ...!

जाता झाला माझा बाप
ती ही होती हीच वेळ
आजही नयनडोह
भरते कातरवेळ...

तुझी उणिव भासता
विसरतो काळवेळ
बापा,तुझ्या पाठीमागे
छळते कातरवेळ...!

लांबत जाता सावल्या
बिलगते सांजवेळ
दुरावलेल्या हातांना
स्मरते कातरवेळ...

स्फुंदते आतुनी झाड
कोमेजते जेव्हा वेल
ओल्या हळूच पापण्या
करते कातरवेळ...!

© अनिल सा.राऊत
             📱 9890884228

Friday, 15 January 2016

टाहो

_________ टाहो __________
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सरकारचे लक्ष सध्या उद्योग उभारणीकडे लागलेले आहे.त्यात वाईट असे काहीच नाही पण शेती आणि शेतकऱ्यांकडे जे दुर्लक्ष होतेय ते नक्कीच योग्य नाही.यावर प्रकाश टाकणारी ही कविता...
             * अनिल सा.राऊत *
             📱9890884228
       ________________________

माणसासारखी माणसं
चालवतात सरकार
दुष्काळाची त्यांना
नाही कसलीच दरकार...
हो व्यापारी आता धन्या तू
अन् पोट भर....
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...१

आम्ही मुकी जित्राबं जरी
तुझं हाल बघून गहिवरतो
'ह्ये सरकारा,बघ इकडं..!'
म्हणत आम्ही हंबरतो...
भूक नसतेच हंबरण्यात
तू उगीचच काळजी ना कर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!....२

पाऊस-पाणी होतं तोवर
घातलंच की तू पोटभरुन
हाय जाणिव आम्हाला ही
बघ,ह्ये डोळंही आलं भरुन..
इकून टाक एखादा तुकडा
अन् बाहूत बळ भर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...३

पडलाच जर 'स्टार्ट अपला'
पैका तुला कमी धन्या
आम्ही कधी उपयोगी पडणार?
दे निरोप आम्हाला धन्या..
ऊठ गड्या ऊठ आता
'मुद्रा'चा तू अर्ज भर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...४

शेतीला तुझ्या,नाही मिळालं
कधी वेळंवर वीज-पाणी
सरकारही करतंय आता
उद्योगवाल्यांचीच भांडी-धूणी
हो शहाणा अन्
हा आतबट्ट्याचा धंदा बंद कर..
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...५

माणसांचा टाहो
माणसांना ऐकू जात नाही
दूष्काळनिधी मिळेपर्यंत
आम्ही काही खात नाही...
धन्या,तू मात्र...
फासाची आस ना धर..
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...६

              * अनिल सा.राऊत *
             📱9890884228

बाप नि माय

_____ बाप नि माय _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

बाप संसाराचे खुरपे
माय खुरप्याची झिजणी
एक उसवते भूईला
एक सोसते टोचणी...

बाप उसवता मातीला
माय पेरते कहाणी
धीर मुठीचा नको सैल
नि माय होते मायनी...

बाप जागता डोळा
माय डोळ्याची पापणी
बाप रचितो सपान
माय साकारते रानी...

बाप घामाचा सागर
माय नदीचं पाणी
दो देहात एक जीव
अशी अतूट कहानी!


         * अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

विठ्ठला...

_____ विठ्ठला... _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

शुष्क
वाळवंटातून
अनवाणी
चालताना
पायांना
जाणवते
दुष्काळाची
भीषणता...
विठ्ठला,
थोडा वेळ
ये खाली
विटेवरुन...
किती युगे
पाहणार आहेस
पुंडलिकाचीच
मातृभक्ती?
फक्त
दोनच मिनिटे
बघ मातृसेवा
या बळीची
अन्
तूच सांग-
त्याच्यासाठी
किती युगे
भरशील विहीरी?

         * अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

मी एकलाच इथे!

:÷:÷:÷:÷:÷ मी एकलाच इथे :÷:÷:÷:÷:

जमला सारा गोतावळा,मी एकलाच इथे
चाललो दूर प्रवासाला..मी एकलाच इथे!

लुटलो किती?कुणासाठी?हिशोब ना केला
तरीही पुरुन उरलो,मी एकलाच इथे!

दुबळे होते हात माझे,घेण्या कुणाचे काही
दातृत्वात आघाडीवर मी एकलाच इथे!

रडू नका लबाडांनो आज धाय मोकलून
ते सत्य तुमचे जाणतो..मी एकलाच इथे!

त्या अश्रुंचेही ऋण करणार वसूल तुम्ही
तरीही नाते निभावतो,मी एकलाच इथे!

उरका पटपट अन् व्हा मोकळे जेवाया
दूर एकांती जळणार,मी एकलाच इथे!

कमवली दौलत ज्यांनी त्यांचाच तुम्हा लळा
कवित्वाने धनवान,तो मी एकलाच इथे!

            © अनिल सा.राऊत
             📱 9890884228

...काळीज माझे

:÷:÷:÷:÷:÷ ....काळीज माझे :÷:÷:÷:÷:
______________________________

मंजुघोषा:- गालगागा गालगागा गालगागा
....................................................

वाटते का कोडगे काळीज माझे?
हाय..!टाहो फोडते काळीज माझे!

झाकल्या त्या वेदना हास्यात जेव्हा
पापणी ओलावते काळीज माझे!

का दिखावा मांडती हे लोक सारे?
दान ते लाथाडते काळीज माझे!

दु:ख येता चोरट्याने रोज दारी
कैदखानी डांबते काळीज माझे!

पाहताना दोन जीवांची जुदाई
आजही पाणावते काळीज माझे!

            © अनिल सा.राऊत
             📱 9890884228

धावुनि तू ये ना...

विरहगीत
_______________________

धावुनि तू ये ना...
_______________________

चित्त नाही थाऱ्यावर...सैरभैर वाऱ्यावर
कुठेच जीवा चैन पडेना?
का अजूनही दूर तू मैना...
   ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना।।धृ।।

फुलून आली बाग जरी
काळजात ही आग तरी
ओतले मी आसवांचे पाणी
काही केल्या विझेना....
       ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना।।१।।

मी एकलाच गातो विराणी
तुझ्या आठवणींची गाणी
सांग किती साद घालू तुला
चैन जीवाला पडेना...
        ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना।।२।।

आतूर मन हे तुला भेटण्या
गुपित ओठांचे तुला सांगण्या
नसता तू जवळी या समयाला
क्षण सरता सरेना...
         ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना।।३।।

होतो कानी भास पैंजणाचा
झाला किती भार यौवनाचा
मिलनास उताविळ जीव वेडा
प्रेमात न्हावू दे ना...
        ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना।।४।।

का अजूनही दूर तू मैना...
   ये ना..ये ना..ये ना सजणी,धावुनि तू ये ना....

          ©अनिल सा.राऊत
         📱9890884228

Monday, 4 January 2016

सावित्री-माझ्या नजरेतून

____ सावित्री-माझ्या नजरेतून ____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

माझ्या
' व्हॉट इज धिस?' प्रश्नाला
तिचं फक्त
डोळे विस्फारुन पाहणं
सहन केलं असतं का मी-
.... आजच्या वैज्ञानिक युगात?
अन्
तिनं चूल सोडली म्हणून
राहिलोय का कधी मी उपाशी?

सावित्री,
या दोन्ही प्रश्नांचे उत्तर
'नाही' हेच येतेय...

होय सावित्री,
तूच झालीस सेतू....
ज्ञान अन् अज्ञानाच्या दरीमधील...
म्हणूनच आज
तिची नजर
झुकत नाही पहिल्यासारखी-
माझ्या प्रश्नाला उत्तर देताना...
किंवा
घाबरतही नाही ती
कर्तव्यासाठी
चूलीला लाथ मारताना!

* अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

ऊन

_____ ऊन _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

ऊन....
निलाजरं,
डोकावतं हळूच
मातीच्या कुशीत
अन्
लाजून
चूर चूर होते माती...
गर्भारलेपण जपताना
ओटीपोटी नजर तिची
अन्
ओल्या पदराआड
आकारतंय जग-
बियांच्या अंतर्यामी!

गर्द काळोखात
अस्फुट हुंदका
बनून जातो
कधी दवबिंदू
कळतच नाही...
ऊन मात्र,
स्वत:चेच
रुप पाहण्यात तल्लीन...!

* अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

पोटासाठी

_____ पोटासाठी _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

म्हणायचंय नुसतं,
चार इंची पोटाला
कितीसं लागतं असं?
पण,
आयुष्याची लांबी-रुंदी
खर्ची पडते
चार इंची पोटासाठीच!
तेव्हा,
समजतही नाही
पोटाची खोली
अन्
क्षमताही!
किती धावायचं
पोटासाठी?
कळलंय का,
कधी कुणाला?

* अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

जगण्याचे स्वप्न

_____ जगण्याचे स्वप्न _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

खोल डोळ्यात
एक स्वप्न घेऊन-जगण्याचे
ती धुंडाळतेय
अंधारवाटा....
चाचपडत,
धडपडत,
अडखळत....

खचत नाही ती
संकटांनी,
भूकेने,
तहानेने...

मात्र,
गर्भगळीत होते
वासनांध नजरांनी
अन्
तिचे स्वप्न
चकनाचूर होते-
शीलाबरोबरच!

* अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

मातीचे नाते

______ मातीचे नाते ______
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

माझ्या फुफ्फूसात
निघेल कदाचित,
फक्त चिमूटभरच माती-
श्वासाबरोबर आत गेलेली...
जणू,
माझ्या सर्वांगातच
मुरली आहे माती-
अगदी,
मी तिच्या कुशीत
विसावेपर्यंत!

                 * अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

हिशोब

______ हिशोब _______
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

हाल-अपेष्टा
भोगल्या तिनेही
पण,
नाही मागितला कधी
त्याचा हिशोब-
आपल्याच अंकुरांना!

आज....
अंकुराचे झाड होताच
लावला जातो हिशोब-
जीर्ण देहाच्या
सांभाळाचा,
दवा-पाण्याचा,
अजून कशा-कशाचा....!

ती मात्र,
काहीच उणे करत नाही
आपल्या
न मागितलेल्या हिशोबातून
अन्
शिवतही नाही कधी
तिच्या मनाला-
उपकाराची भाषा
किंवा
असला व्यवहारिकपणा!

              * अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

घास

_____ घास _____
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

उनाड पिल्ल्यांची
बखोटी धरुन
त्यांच्या चोचीत
घास भरवताना
आपली भूक
विसरून जाते,
चिमणी...!

तिच्या पोटातील कावळे
तेव्हाही शहाणेच होते-
कर्तव्याच्या जाणिवेने...
आणि
आजही शहाणेच आहेत-
परावलंबित्त्वाच्या असहाय्यतेने!

         * अनिल सा.राऊत *
         📱9890884228
                  ( गारवामधून )
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Friday, 1 January 2016

झालो कधीचा मी दिवाना

रूप तुझं सोळा आणे,डोळ्यात गं माईना
विचार माझ्या नजरंला,कशास पाहिजे आईना....
तुला बघून...तुला बघून
झालो कधीचा मी दिवाना।।धृ।।

रेशमी तुझ्या केसांची,पाणीदार डोळ्यांची
लालचुटूक ओठांची,मोरपिशी स्पर्शाची
नशा मनातून गं जाईना...
तुला बघून...तुला बघून
झालो कधीचा मी दिवाना।।१।।

चाल तुझी ठेक्याची,जवानीच्या मस्तीची
जादू तुझ्या नजरेची,मदिरेच्या धुंदीची
करी बेहोश सारा जमाना...
तुला बघून...तुला बघून
झालो कधीचा मी दिवाना।।२।।

ओढ तुझ्या मिठीची,पहिल्या गं भेटीची
काया तुझी रुप्याची,आस दावते रातीची
ती चंदेरी रात काही येईना...
तुला बघून...तुला बघून
झालो कधीचा मी दिवाना।।३।।

ही सांज गं मोक्याची,समजू नको धोक्याची
तुझ्या माझ्या प्रेमाची,बात घडवू लाखाची
तुझ्यावाचून क्षण ही जाईना...
तुला बघून...तुला बघून
झालो कधीचा मी दिवाना।।४।।

📝 गीत-अनिल सा.राऊत 📝
    📱9890884228

गजल

गजल
✒✒✒✒✒✒✒

वृत्त-मंजुघोषा
लगावली-गालगागा गालगागा गालगागा

दार माझ्या काळजाचे वाजलेले
रान सारे खंजिरांनी माजलेले!

आज साक्षीला कसा सांगा उभारु ?
काल माझे तोंड त्यांनी दाबलेले!

ठार बापा मारण्याला तेच आले
जोजवाया दूध ज्यांनी पाजलेले!

रीत न्यारी या जगाची पाहतो मी
छाटले का हात त्यांनी राबलेले?

भाकरीसाठी किती जाळू जवानी
नाव सार्थकी तुझे मी लावलेले!

* अनिल सा.राऊत *
📱9890884228