Friday 15 January 2016

टाहो

_________ टाहो __________
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सरकारचे लक्ष सध्या उद्योग उभारणीकडे लागलेले आहे.त्यात वाईट असे काहीच नाही पण शेती आणि शेतकऱ्यांकडे जे दुर्लक्ष होतेय ते नक्कीच योग्य नाही.यावर प्रकाश टाकणारी ही कविता...
             * अनिल सा.राऊत *
             📱9890884228
       ________________________

माणसासारखी माणसं
चालवतात सरकार
दुष्काळाची त्यांना
नाही कसलीच दरकार...
हो व्यापारी आता धन्या तू
अन् पोट भर....
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...१

आम्ही मुकी जित्राबं जरी
तुझं हाल बघून गहिवरतो
'ह्ये सरकारा,बघ इकडं..!'
म्हणत आम्ही हंबरतो...
भूक नसतेच हंबरण्यात
तू उगीचच काळजी ना कर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!....२

पाऊस-पाणी होतं तोवर
घातलंच की तू पोटभरुन
हाय जाणिव आम्हाला ही
बघ,ह्ये डोळंही आलं भरुन..
इकून टाक एखादा तुकडा
अन् बाहूत बळ भर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...३

पडलाच जर 'स्टार्ट अपला'
पैका तुला कमी धन्या
आम्ही कधी उपयोगी पडणार?
दे निरोप आम्हाला धन्या..
ऊठ गड्या ऊठ आता
'मुद्रा'चा तू अर्ज भर...
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...४

शेतीला तुझ्या,नाही मिळालं
कधी वेळंवर वीज-पाणी
सरकारही करतंय आता
उद्योगवाल्यांचीच भांडी-धूणी
हो शहाणा अन्
हा आतबट्ट्याचा धंदा बंद कर..
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...५

माणसांचा टाहो
माणसांना ऐकू जात नाही
दूष्काळनिधी मिळेपर्यंत
आम्ही काही खात नाही...
धन्या,तू मात्र...
फासाची आस ना धर..
कर बाबा कर तू
खुशाल उद्योग उभा कर!...६

              * अनिल सा.राऊत *
             📱9890884228

No comments:

Post a Comment