Sunday, 17 January 2016

कातरवेळ

:÷:÷:÷:÷:÷ ....कातरवेळ :÷:÷:÷:÷:
....................................................

दिले वचन येण्याचे
उलटून जाते वेळ
तिच्या प्रतीक्षेत अशी
सरते कातरवेळ...

येते जेव्हा लवकरी
अबोल्याचा चाले खेळ
ओठांतुनी अलगद
झरते कातरवेळ...!


डोळे उभे वाटेवरी
माय येण्याची ही वेळ
ना दिसता...जीवघेणी
ठरते कातरवेळ...

सूर्य झिरपता रानी
लागे भाकरीचा मेळ
माय होते ओली ओली
भिजते कातरवेळ...!

जाता झाला माझा बाप
ती ही होती हीच वेळ
आजही नयनडोह
भरते कातरवेळ...

तुझी उणिव भासता
विसरतो काळवेळ
बापा,तुझ्या पाठीमागे
छळते कातरवेळ...!

लांबत जाता सावल्या
बिलगते सांजवेळ
दुरावलेल्या हातांना
स्मरते कातरवेळ...

स्फुंदते आतुनी झाड
कोमेजते जेव्हा वेल
ओल्या हळूच पापण्या
करते कातरवेळ...!

© अनिल सा.राऊत
             📱 9890884228

No comments:

Post a Comment