Tuesday, 28 July 2015

आठवणींचा बाजार



आठवणींच्या बाजारातून
फेरफटका मारताना...

कोलाहलात विरुन जाते
जराशी पुसट आठवण ती
जीवनसंघर्षाच्या आठवणी मात्र
धावून येतात अंगावर-
बाजारातल्या मोकाट जनावरांसारख्या
अन्
उभा राहतो अंगावर काटा!

काही आठवणी
सडून जातात आतल्या आत-
कांद्या-बटाट्याप्रमाणे
तर काही राहतात 
कायमच ताज्या-
पाणी मारुन मारुन
चकाकवलेल्या भाज्यांप्रमाणे!

भरला बाजार,संपलेला असतो
तरीही,
एक आवाज येतो,
"मी इथेच आहे...
तुझी वाट पाहत...!"

अन् 
मी पुन्हा नव्याने
धुंडाळत फिरतो...
फक्त,
तिच्याच आठवणींचा बाजार!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Monday, 13 July 2015

हे अनिल !


(अनिल =वारा)

हे अनिल! असा मोकळा ना ये भेटीला
राखण्या थोडी लाज,हो,सुदामा आज तू...
नसेल पुरचुंडी पोह्याची तुजपाशी
आणून जलमेघ ते,चढव साज तू...!

थांबली रे सळसळ हिरव्या पानांची 
यातना किती जीवाला,कर अंदाज तू...
नको गाऊ मयसभेतली ती विराणी
आळव मेघमल्हार,घुमव गाज तू...!

शीळ तुझी रे अशी, ना सर बासरीची
भीते पालवी कोवळी,तो दगाबाज तू...
दे विश्वास कि सोबती आणेन वर्षाव
त्या थेंबांचा पाड कानी,गोड आवाज तू...!

बहरेल ती प्रीत जूनी पुन्हा नव्याने
खोल नवथर गाली,सगळे राज तू...
वाजता बासरी सळसळे पानाअंगी
पोटरीत येता कुणी,पाळ रिवाज तू...!

ऐन भरात नको आक्रीत घडाया रे
अवकाळी जमले ते,कुठे विराज तू...
विनवितो हा 'अनिल', 'हे अनिल' तुला 
पांगवाया त्यांना आता,दाखव माज तू...!

*अनिल सा. राऊत*
9890884228


visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

Saturday, 11 July 2015

शूss...!कुछ बोलने का नाय


चुलवानाला ठोकर मारुन
बया शिकाया भायेर पडली
शेरडा करडा म्हागची पोरं
गड्या कालेजाला भिडली...
शिकून करतील उद्धार कुळाचा
छाती फुगवून बा सपान पाह्य..
पोराईंच्या हे ध्यानात बी नाय-
शूss...! कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....

पोरीनं कापल्या लांब झिपऱ्या
पोरानं घातली झक्कड येणी
हटकलं जाणत्यापणानं तर
फ्यासन हाय म्हणत्यात बेणी...
करेनात का बापडी,करु दे
फुलायचं ह्येच तर वय हाय
'झुलत' नाय ह्येच बेस हाय-
शूss...! कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....

वह्या पुस्तकं नसतातच कधी
मोबाइलच सारखा हातामधी
कानात गोळं न् गळ्यात दावं
चालणं बघ कसं ठेक्यामधी...
'जगाला प्रेम अर्पावे' ह्ये शिकून
नवं जग त्यास्नी बघायचं हाय
तिच्या पायाखाली याचा पाय-
शूss...! कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....

एकांतांत असतो हातात हात
कधी कधी व्हटांचीबी साथ
लाजंसाठी हवंच असतं 'लॉज'
अन् नकळत घडून जाते बात..
इचारलंच कुणी संशयानं तर
म्हणत्यात आमची मैत्री हाय
'लफड्याचं' नाव द्यायचं नाय-
शूss...! कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....

मोबाईलनं बिघडून गेली पिढी
इस्कटली अभ्यासाचीही घडी
बघेल तवा त्या मोबाईलवरनं
फिरवत्यात बोटाची काडी...
लाईनीवर आणावं म्हटलं तर
म्हणत्यात,नोट्स मला नाय
अॉनलाईन 'अभ्यास' चालू हाय-
शूss...! कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....!!

आयला आय म्हणायचं नाय
बापाला बाप म्हणायचं नाय
सांभाळता येत नाय तर
जन्माला पण घालायचं नाय...
बापानं त्या सांगा करावं काय?
माय हुंदकते आत धाय-धाय
अन् करपून जाते दुधावरची साय-
शूss...!कुछ बोलने का नाय
इथं सबकुछ अलबेल हाय....!!

*अनिल सा. राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

Monday, 6 July 2015

अवकाळ गाभणं अन् वांझोटं वाहणं


खरं खरं सांग पावसा आता तूच मला
या मंत्र्या-संत्र्यांनी किती दिली लाच तुला ?

यायचा येळंवर अन् पिकवून जायचा शेतं
डोळं फाडफाडून बघत राह्यचं लांडगं नेतं !

टाईमाच्या टाईमाला येणं तुझं पक्कं असायचं
तजबीज करताना काळजीचं कारण नसायचं !

जेवढी काळया मायची पोटाची भूक असायची
तेवढीच तुझी दुरडीही 'वरनं' रिती व्हायची !

सगळं कसं आबादी आबाद चाललं होतं
पुढाऱ्याचं पाय धरायचं नशिबी येत नव्हतं !

कुणाची लागली नजर तुझ्या टायमिंगला ?
कुणाच्या 'पार्टीने' तुझा 'तोल' गड्या चालला ?

हवा असतो तेव्हाच पाडतोस दुष्काळ कसा ?
छावणीत गुरांचा 'घास' नेत्यांना 'चारतो' कसा ?

का गड्या वणवण पाण्यापायी दरसाल अशी?
बगळ्या-माफियांची भरतो थैली गच्च कशी?

ओतून घाम कुणबी पीक आणतो जोरात
टपकतो अवकाळी आनंदाच्या ऐन भरात!

करुन सारा सपाराम डोळ्यातल्या सपनांचा
भरतो रांझण नेत्यांचा अन् सरकारी 'बाबूं'चा !

म्हणुन,खरं खरं सांग पावसा आता तूच मला
या मंत्र्या-संत्र्यांनी किती दिली लाच तुला ?

थांबव बाबा आता तुझं हे 'खाबु' वागणं
उगीच अवकाळ गाभणं अन् वांझोटं वाहणं...!

*अनिल सा. राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

                 

Saturday, 4 July 2015

बाप आणि मुलगा



मुलगा जेव्हा शहरातून गावाकडे येतो
मातीने पाय घाण होवु नयेत म्हणून जपतो ....
तेव्हा बापाला अभिमान वाटतो पोराचा
गर्वाने आणखी खोल रुतत जातो पाय त्याचा...

माझा मुलगा साहेब झाला सांगतो सर्वांना
त्याच्या दिमतीसाठी राबवतो घराबाराला.....
पोराला ञास नको उन्हाचा म्हणून
बाजेला ठेवतो थंडगार झाडाखाली आणून....

सटी सहामाही येणारा भज्याचा घमघमाट
पोरासाठी माञ रोजचाच राजेशाही थाट....
टोपल्यातला भाकर तुकडा तोडता तोडता
बापाचा दात वाचतो मोडता मोडता....

कुठेही नको कसर कसलीही रहायला
म्हणून सारखा खेकसतो बायकोला....
सुनेसाठी जुळवा जुळव करुन पैशाची
नऊवारी घेऊन येतो झकास कशिद्याची....

जाता जाता मुलगा म्हणतो आई-बापाला
निवांत झाल्यावर या एकदा शहराला....
आईला ओढ असते पोराचा संसार पहायची
बापाला काळजी असते पोराच्या संसाराची....

आईची ओढ अन् बापाची काळजी एकवटते
खेड्यातली वरात मग शहराकडे निघते.....
पायाच्या मातीला अप्रुप गुळगुळीत रस्त्याचे
फिटतात पांग खाल्लेल्या त्या खस्तांचे....

पाहुन बापाचे ते धुळभरले पाय दारात
मुलगा चिंतेत-कसे नेवू यांना घरात !
लाखाच्या फरशीला नको मातीचा डाग
सुनेच्या डोळ्यात केव्हाच पेटलेली आग !

स्वागताला होत्या कपाळावर कैक आट्या
जेवणाला होत्या रागात करपलेल्या रोट्या !
कुठे गेला तो रोजचा भज्याचा घमघमाट ?
वाढला किती तो किचनमधला खणखणाट ?

बापाच्या गबाळ्या अवताराची वाटायची लाज
बापाला बाप म्हणायची झाली होती पंचाईत !
नव्हता मागमुस कुठेच त्या आपुलकीचा
जसा बापाला गर्व होता साहेब मुलाचा !

मोकळ्या ढाकळ्या वातावरणातली जोडी
शहराच्या बंद हवेत गुदमरुन जाई बापुडी !
कामाच्या रहाटगाडग्याची करुन घोडी
दोघांनी जखमी काळजाने हसत गाठली झोपडी !

*अनिल सा.राऊत*
9890884228

अस्तित्व?


                                               
हळुवार अशा हातांनी, कुणी मला कुरवाळत होतं...
दोन शब्द प्रेमाचे,कुणी माझ्याशी बोलत होतं .....
बोलता बोलताच,कुणी माझं ह्रदय खोलत होतं...
हळुच नाकळत,कुणी ह्रदयात शिरत होतं....
एवढं प्रेम होतं तर चेहरा का लपवत होतं ?
सांग ना तू...
या स्वप्नात तुझं तर अस्तित्व नव्हतं ?


*अनिल सा.राऊत*
9890884228

आईला भेटायला कधी जायचं?

एकानं आग झालं तर-
दुस-यानं पाणी व्हायचं,
एकानं वणवा झालं तर-
दुस-यानं पाऊस व्हायचं....

हे सगळं शहाणपण

मीच तुम्हाला शिकवायचं ?
सांगा ना बाबा,
आईला भेटायला कधी जायचं ?

झाले असतिल हेवेदावे

दुखावली असतिल मने
`सामंजस्य´ हा एकच उपाय
जरी असतिल हजार कारणे...

घेतली सुटका करून दोघांनीही

पण माझ्या मनानं काय करायचं ?
सांगा ना बाबा,
आईला भेटायला कधी जायचं ?

घर म्हटलं कि

भांड्याला भांडं लागतंच असतं
आवाज होवू नये म्हणून
भांड्यांना थोडं गोंजारायचं असतं...

हा कसला न्याय तुमचा-

भांडंच कसं मोडीत काढायचं ?
सांगा ना बाबा,
आईला भेटायला कधी जायचं ?

तुमचं सगळं खरं झालं हो

पण माझा काय दोष होता ?
एकमेकांना दोष देता देता
दोषांचा डोंगर माझ्यावरच कोसळत होता....

लवकर ठरवा आई-बाबा,

नाहीतर
विरहाने हे प्राणपाखरू उडून जायचं...
सांगा ना बाबा,
आईला भेटायला कधी जायचं ?
आईला भेटायला कधी जायचं ?

*अनिल सा.राऊत*

9890884228


हे बंगल्याच्या दारांनो...!

हे बंगल्याच्या दारांनो,
किती झिडकाराल माणुसकीला?
जरा डोळे उघडून बघा-
गुदमरू लागलाय श्वास `माणुसकीचा´!
जरा मोकळ्या हवेत बघा...
लांब कशाला?
माझ्या झोपडीतच बघा-
माणसांची चाहुल लागताच
डे-यावरच्या तांब्याला
चिमुकले पाय फुटतात,
दाराला नसलेला उंबराही
नतमस्तक होतो स्वागतासाठी!
चहाचं पातेलं
किणकिणत चुलीवर जावून बसतं...
मग,
चुलीलाही स्फुरण चढतं ;
म्हणते,
``जेवूनच जावा आत्ता!´´
एवढंच काय,
शेजारी-पाजारी कुणाला
आलाच सांगावा देवाचा-
तर-
डे-यावरचा तांब्या
गडागडा लोळतो,
चहाचं पातेलं
आंघोळच करीत नाही,
चूल तर बंडच पुकारते
आणि
माणसांच्या पोटातील कावळे
गायब होतात तीन-तीन दिवस!
हे बंगल्याच्या दारांनो,
असं घडतंय का कधी-
तुमच्या `आत´मध्ये ?


*अनिल सा.राऊत*
9890884228

         

बोभाटा

नाही केला कधी बोभाटा, माझ्या मी दुःखाचा
उराच्या पिंज-याला केला,कैदखाना मी दुःखाचा

दुखले असेल पोटात कधी, ओठांना मागमुस नव्हता
चोचीत पक्षांच्या दिले क्षण,प्रसार कराया सुखाचा

भोगली किती शिक्षा दुःखाने,झाले असेल दुःखी
नाही हिरावला आनंद कधी, स्वार्थाने माझ्या मी सुखाचा

दिले निमंञण मी परदुःखाला,बदल्यात सुख माझे
वाहिला `अनिल´ असा ,हळूवार, शिडकाव कराया सुखाचा


*अनिल सा.राऊत*
9890884228

दुष्काळ

त्या गावाहून
या गावाला
तू आलीस...
हाताला काम
अन्
पोटाची खळगी भरण्यासाठी!
तू तरुण होतीस -
         सुंदर होतीस
तुझ्या तारुण्याने आणि सौंदर्याने
चांगलाच `हातभार´ लावला-
तुझ्या हाताला काम मिळवायला!
तुझे हात थकुन जायचे
पोट उपाशी नाही रहायचे...
हे असं फक्त
चारच दिवस चाललं....
पाचव्या दिवसापासून माञ-
तुझे हात आराम करायचे
अन्
पोट माञ
श्रीमंतीचे `घाव´ सोसायचे
तरीही `ते´ हवेहवेसे वाटायचे!
तिकडे दुष्काळ
अन्
इकडे सुकाळ
पैशांचा अन् पापाचाही...
त्यापेक्षा तिकडचा
दुष्काळच परवडला असता-
पाण्याचा अन् पापाचाही...!
*अनिल सा.राऊत*
9890884228

फक्त एकदाच भेटून जा....!

जोपर्यंत चंद्र,सूर्य आहेत
तोपर्यंत मी तुझीच राहणारआहे
असं म्हणणारीही तुच
अन्
न सांगताच गुलाबी फूले
पायाखाली तुडवित गेलेलीही तुच....
तुझ्या कोणत्या गोष्टीवर
विश्वास ठेवावा हेच मला
कळेनासं झालं आहे
म्हणून
फक्त एकदाच भेटून जा...
माझ्या जीवाचे हाल बघून जा...!

तुझ्या माझ्या प्रत्येक भेटीत
दिली घेतलेली ती वचने,
शपथा,आणाभाका.........
हे सर्व मला 
करायला लावणारीही तुच
अन्
सगळं काही सोईस्करपणे विसरुन
स्वतःच्या विश्वात निघून जाणारीही तुच...!
जसं वचनं, शपथा,आणाभाका
घ्यायला शिकवलंस
तसंच
ती मोडायची कशी हे
तू मला शिकवलंच नाहीस
म्हणून
फक्त एकदाच भेटून जा...
हे सगळं मला शिकवून जा...!

सगळ्या जगाला विसरुन
माझ्या मिठीत येण्यासाठी
अधीर झालेलीही तुच
अन्
मी बाहू पसरुन बसलो तेव्हा
जगाची भीती दाखवणारीही तुच...
तुला तर नेहमी 
एकच रंग आवडायचा
मग
हे  असं रंग बदलणं
तू कुठं शिकलीस?
म्हणून
फक्त एकदाच भेटून जा...
असं रंग बदलणं शिकवून जा...!

माझ्या बेरंग आयुष्याला
इंद्रधनुष्यी किनार देवून
आयुष्य बदलणारीही तुच
अन्
बहरलेल्या जीवनाला
निष्पर्ण करणारीही तुच...
श्रावणातल्या रिम-झिम सरीसम
ऊन-पावसाचा खेळ खेळून
मला तू झुलवत राहिलीस...
म्हणून
फक्त एकदाच वर्षाराणी बनून जा...
मला चिंब चिंब भिजवून जा...!
मला चिंब चिंब भिजवून जा ...!!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Thursday, 2 July 2015

तोडून टाक ते पाय...!

ऊड ऊड रे पाखरा,म्हणती हे बाटलेले
वळूनि बघ....आधीच त्यांनी पंख छाटलेले !

फिरूनि पुन्हा करतील एक नवी नौटंकी
पुसतील अश्रु नयनी तुझ्या दाटलेले !

करिती वल्गना  `सालगड्यासम' राबण्याच्या
होते ध्येयाने परि आगळया झपाटलेले !

दिंडीत `आश्वासनांच्या' तू ही `टाळ' करी होता
ते हात ही कोरडे अन् आकाश फाटलेले !

तोडून टाक ते पाय तू घावात एका मर्दा
होते जे लाचारीने कधी काळी चाटलेले !

ना राहिला कुणावर विश्वास `अनिल' आता
मोडले त्यांनीच संसार किती थाटलेले ?

*अनिल सा. राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

वादळ

वादळ




असेल मनात तर भेटून जा
नसेल मनात तर खेटून जा !

कधी यावे वाटले मला छळायला
स्वप्नात तू बिनबोभाट छळून जा !

व्यवस्थे,आहेस रसिक वारांगना
धनिकांचीच रोज शेज करुन जा !

काय कल्पिले अन् काय घडवले ?
सटवे, पुन्हा अक्षरे तू लिहून जा !

नेमेची दडी, येतोस का अवकाळी?
पावसा तूच आता फाशी देवून जा !

कधी झुळूक, कधी बेभान `अनिल´
उरीचे हे वादळही शमवून जा !

*अनिल सा.राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

सुराज्य

********* -:सुराज्य:- **********
    (अनिल सा.राऊत 9890884228)
**************************

का स्वप्ने पाहता सज्जन हो,सत्कर्म आहे गाडलेले 

चौफेर कुकर्माचेच राज्य आहे वाढलेले...!

राहिला ना कुणीच शिलवंत,कुलवंत कसा इथे ?

कुलीन बलत्काऱ्याने शील आहे फाडलेले...!

झाला खून भरदिवसा कसा रे अंतरीच्या बंधूत्वाचा ?

भावानेच सुपारीबाजाला आहे धाडलेले...!

आले स्वराज्य...करणार म्हणे ते तयाचे सुराज्य 

मतांकरिता मावळयांनाच आहे नाडलेले...!

ना भय कसले उरले आता या मातीत मायबाप

चोरांनीच रक्षकांना बघ आहे ताडलेले...!

नाहीच प्रसवणार कधी सदाचार या कूशीतुनि

गर्भाशय मेंदूचे केव्हाच आहे काढलेले...!


*अनिल सा.राऊत*

9890884228

Visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

Wednesday, 1 July 2015

पह्यलं भावाचं बोला...

तुमच्या पदव्यांचं भेंडोळं 
तिकडं चुलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

घोटाळ्यांवरचं ध्यान 
हिकडं तिकडं वळवता
जे छापून यायला हवं
नेमकं तेच कसं गाळता?

रंगवून रंगवून सांगता
माझा शेतकरी कसा मेला?
कधी सांगितलं नाही 
बिचारा का मेला.....?
तुमची पञकारीता
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

साट्या लोट्याचा हा
चालला तुमचा खेळ
दाण्याच्या राशीतच
उंदरा-मांजराचा मेळ

राव गेले चरुन
पंत आले जगायला
पंत ही जातील चरुन
राव येतील जगायला....
तुमचं राजकारण
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

लोणी गिळून बोकं फरार
पुरावं काय शोधत बसता?
साधूला चोर करता येईल
पण चोराला संत कसं करता?

भाकरीला भाकरच म्हणायचं
त्याला पुरावा हवा कशाला?
जवा पीळ पडंल भुकंनं
तवा पुरावा इचारा आतड्याला...
तुमचं काळं पांघरुन
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

लय झालं तुमचं 
डोळ्यात चटणी फेकणं
मेल्यावर शेतकरी मग
लाखाचं चेक लिव्हणं

आपलंच डोळं उघडून
आता हवं जरा बघायला
शेत वरीसभर सगळ्यांनी
एकीनं पडाक पाडायला...
तवा म्हणतील सगळेच
पह्यलं पिकवायचं बोला!
पह्यलं पिकवायचं बोला !!

*अनिल सा.राऊत *
9890884228

बा

बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...

तळहातावरच्या फोडाप्रमाणं
बा नं मला जोजवलं
पोरगा साहेब व्हावा म्हणून
सारं काही पुरवलं...
बुध्दीला नियतीची साथ
कधी मिळालीच नाही
अन् बापाचं सपान काही
सत्यात उतरलं नाही
तेव्हापासुन त्यानं कधी
मला जोजवलं नाही-
बा चं अन् माझं
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

आईनं धोपटायचं
बा नं मायेनं थोपटायचं
माझ्या कोवळ्या अश्रूंना
त्याच्या धोतरानं पुसायचं...
झोपलो उपाशी कधी तर
झोपेतच मला भरवायचं
सकाळी माञ त्यातलं
काहीच नाही आठवायचं...
बा नं हळूच म्हणावं
पोरगं राती जेवलं नाही-
बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

घामाच्या वाहवून धारा
दिवस सरकले भरारा
मी झालो तरणा अन्
बा झाला हो म्हातारा...
अंगाखांद्यावर होता त्याच्या
तरीही भार माझा सारा
काळजीने माझ्या त्याचा
पोखरला होता देह सारा...
कळत असूनही सारं
मला काहीच कळलं नाही-
बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

किती खाल्ल्या खस्ता
काट्यांचा तुडवला रस्ता
हाल हाल झाले जीवाचे
बा गेला माझा रे अस्ता...
कवितेनं पोट भरत नसतं
बा चं तत्वज्ञान कधी पटलं नाही
आज बा वर  कविता लिहीताना
माझ्या अश्रूंना मी रोखलं नाही-
माझ्या अश्रूंना मी रोखलं नाही !!

*अनिल सा.राऊत*
9890884228

भ्रष्टाचार



बोकाळला भ्रष्टाचार
आता लागले मला कळू
बांधली मुंगशी तरी 
शेंडे खुडतात हे वळू....!...||०||

केली मतांची पेरणी
नाही पाहिली कशी कीड?
सगळेच सोंडकीडे
त्यांची आतून जांगजोड....
वरुन दिसे भरीव
खाली लागले पीठ गळू-
बोकाळला भ्रष्टाचार
आता लागले मला कळू
बांधली मुंगशी तरी 
शेंडे खुडतात हे वळू....! .....||१||

दिले ओंजळीने पाणी
त्यांनी रे पखाली भरल्या
कोरड घशास सदा
ज्यांनी रे विहीरी खोदल्या....
स्वार्थात इथे आंधळे
कर्तव्यास लागले टाळू-
बोकाळला भ्रष्टाचार
आता लागले मला कळू
बांधली मुंगशी तरी 
शेंडे खुडतात हे वळू....!...||२||

होते चांगले अंकूर
त्यांना ही वेढावते तण
नको मनःस्ताप फुका
तशीच उपज, जसे रान...
लागण झाली दवांना
शिष्टाचार लागले जाळू-
बोकाळला भ्रष्टाचार
आता लागले मला कळू
बांधली मुंगशी तरी 
शेंडे खुडतात हे वळू....!....||३||

आस होती पायलीची
हाती लागे उगी पसाभर
त्यांच्या सोंडेची साठण
जशी की धरणीचे अंबार...
तरी चाटून पुसून
रक्ताळती मड्यांची टाळू-
बोकाळला भ्रष्टाचार
आता लागले मला कळू
बांधली मुंगशी तरी 
शेंडे खुडतात हे वळू....!....||४||

*अनिल सा.राऊत*
9890884228

हप्ता

गुन्हेगारांनो,खुशाल गुन्हे करा
आमच्याकडे कमी आहे वेळ
तुमच्याकडे दिले सारे लक्ष तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||०||

दाण्यात खडे की खड्यात दाणे
एवढे भरघोस पीक आपले
कुणा-कुणावर लक्ष ठेवणार
आमचे हे फक्त दोन डोळे...

ज्यांना कुणी गॉडफादर नाहीत
अशांसाठीच फक्त आहेत हो जेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||१||

करणारे करतात कायदे कठोर
कशाला उगीच काळजी करता?
दोन नंबरचीच ही लायसन असते
तुमचे भरता अन् आमचेही भरता...

पगारपाणी कमी, पोटाची भूक मोठी
ईमानदारी जावू द्या लावित तेल
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||२||

मेले तर मरु द्यात,माल हवा कडक
वैतागलेल्या बायकांना करु थोडी मदत
रोज पिदोड्याचा मार खाण्यापेक्षा
बरे झाले `गेला´ म्हणतील रडत रडत

सरकार आहेच की पाठीशी त्यांच्या
तुम्ही बिनधास्त करा हो भेसळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||३||

आम्ही मारल्यासारखे करतो
तुम्ही रडल्यासारखे करा
टारगेट दाखवण्यापुरतेच तेवढे
आम्हांस सहकार्य करा

जनाची-मनाची म्हणायचंच नाही
सगळीकडे असाच चाललाय हो खेळ
तुमच्याकडे दिले सारे ध्यान तर
हप्त्याचा कसा बसणार मेळ...||४||

*अनिल सा.राऊत*
9890884228

मी नाही त्यातली...

********मी नाही त्यातली******
      

नका आळ घेऊ जाऊबाई

आधी सांगा का एवढी घाई ?
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||०||

`सदना´चं मी काही बोलणार नाही

पुन्हा कधी `चिक्की´खाणार नाही
अळीमिळी गपचिळी मजेत राहू
बोभाट्याने ओरडतील सासूबाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||१||

कुणी मारला डोळा,कुणी `डल्ला´

तुम्हालाच झाली होती किती घाई ?
सारेच कशाला उघडून सांगु लोका
माकडाच्या हाती उगीच कोलीत जाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||२||

शेजारणीची बघा किती आहे `पदवी´

आपले झाकून दुस-याचे वाकून पाही
उणीदुणी तिची काढू आपण मिळून
वळवू विषय मग कसली चिंता नाही...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||३||

तुमचे तोंड तिकडे ,माझे इकडे

यातच बघा असा `घोटाळा´ होई
मलई खावू दोघी वाटून वाटून 
अन् उडवून लावू तोंडाळ सासुबाई...
तुमचे झाकते,माझेही झाका
मी नाही हो त्यातली बाई....||४||

*अनिल सा.राऊत

9890884228