Wednesday 1 July 2015

बा

बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...

तळहातावरच्या फोडाप्रमाणं
बा नं मला जोजवलं
पोरगा साहेब व्हावा म्हणून
सारं काही पुरवलं...
बुध्दीला नियतीची साथ
कधी मिळालीच नाही
अन् बापाचं सपान काही
सत्यात उतरलं नाही
तेव्हापासुन त्यानं कधी
मला जोजवलं नाही-
बा चं अन् माझं
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

आईनं धोपटायचं
बा नं मायेनं थोपटायचं
माझ्या कोवळ्या अश्रूंना
त्याच्या धोतरानं पुसायचं...
झोपलो उपाशी कधी तर
झोपेतच मला भरवायचं
सकाळी माञ त्यातलं
काहीच नाही आठवायचं...
बा नं हळूच म्हणावं
पोरगं राती जेवलं नाही-
बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

घामाच्या वाहवून धारा
दिवस सरकले भरारा
मी झालो तरणा अन्
बा झाला हो म्हातारा...
अंगाखांद्यावर होता त्याच्या
तरीही भार माझा सारा
काळजीने माझ्या त्याचा
पोखरला होता देह सारा...
कळत असूनही सारं
मला काहीच कळलं नाही-
बा चं अन् माझं 
कधी पटलं नाही
ह्रदयातलं प्रेम माञ
कधीच आटलं नाही...!

किती खाल्ल्या खस्ता
काट्यांचा तुडवला रस्ता
हाल हाल झाले जीवाचे
बा गेला माझा रे अस्ता...
कवितेनं पोट भरत नसतं
बा चं तत्वज्ञान कधी पटलं नाही
आज बा वर  कविता लिहीताना
माझ्या अश्रूंना मी रोखलं नाही-
माझ्या अश्रूंना मी रोखलं नाही !!

*अनिल सा.राऊत*
9890884228

No comments:

Post a Comment