Saturday 4 July 2015

बाप आणि मुलगा



मुलगा जेव्हा शहरातून गावाकडे येतो
मातीने पाय घाण होवु नयेत म्हणून जपतो ....
तेव्हा बापाला अभिमान वाटतो पोराचा
गर्वाने आणखी खोल रुतत जातो पाय त्याचा...

माझा मुलगा साहेब झाला सांगतो सर्वांना
त्याच्या दिमतीसाठी राबवतो घराबाराला.....
पोराला ञास नको उन्हाचा म्हणून
बाजेला ठेवतो थंडगार झाडाखाली आणून....

सटी सहामाही येणारा भज्याचा घमघमाट
पोरासाठी माञ रोजचाच राजेशाही थाट....
टोपल्यातला भाकर तुकडा तोडता तोडता
बापाचा दात वाचतो मोडता मोडता....

कुठेही नको कसर कसलीही रहायला
म्हणून सारखा खेकसतो बायकोला....
सुनेसाठी जुळवा जुळव करुन पैशाची
नऊवारी घेऊन येतो झकास कशिद्याची....

जाता जाता मुलगा म्हणतो आई-बापाला
निवांत झाल्यावर या एकदा शहराला....
आईला ओढ असते पोराचा संसार पहायची
बापाला काळजी असते पोराच्या संसाराची....

आईची ओढ अन् बापाची काळजी एकवटते
खेड्यातली वरात मग शहराकडे निघते.....
पायाच्या मातीला अप्रुप गुळगुळीत रस्त्याचे
फिटतात पांग खाल्लेल्या त्या खस्तांचे....

पाहुन बापाचे ते धुळभरले पाय दारात
मुलगा चिंतेत-कसे नेवू यांना घरात !
लाखाच्या फरशीला नको मातीचा डाग
सुनेच्या डोळ्यात केव्हाच पेटलेली आग !

स्वागताला होत्या कपाळावर कैक आट्या
जेवणाला होत्या रागात करपलेल्या रोट्या !
कुठे गेला तो रोजचा भज्याचा घमघमाट ?
वाढला किती तो किचनमधला खणखणाट ?

बापाच्या गबाळ्या अवताराची वाटायची लाज
बापाला बाप म्हणायची झाली होती पंचाईत !
नव्हता मागमुस कुठेच त्या आपुलकीचा
जसा बापाला गर्व होता साहेब मुलाचा !

मोकळ्या ढाकळ्या वातावरणातली जोडी
शहराच्या बंद हवेत गुदमरुन जाई बापुडी !
कामाच्या रहाटगाडग्याची करुन घोडी
दोघांनी जखमी काळजाने हसत गाठली झोपडी !

*अनिल सा.राऊत*
9890884228

No comments:

Post a Comment