Wednesday, 1 July 2015

पह्यलं भावाचं बोला...

तुमच्या पदव्यांचं भेंडोळं 
तिकडं चुलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

घोटाळ्यांवरचं ध्यान 
हिकडं तिकडं वळवता
जे छापून यायला हवं
नेमकं तेच कसं गाळता?

रंगवून रंगवून सांगता
माझा शेतकरी कसा मेला?
कधी सांगितलं नाही 
बिचारा का मेला.....?
तुमची पञकारीता
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

साट्या लोट्याचा हा
चालला तुमचा खेळ
दाण्याच्या राशीतच
उंदरा-मांजराचा मेळ

राव गेले चरुन
पंत आले जगायला
पंत ही जातील चरुन
राव येतील जगायला....
तुमचं राजकारण
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

लोणी गिळून बोकं फरार
पुरावं काय शोधत बसता?
साधूला चोर करता येईल
पण चोराला संत कसं करता?

भाकरीला भाकरच म्हणायचं
त्याला पुरावा हवा कशाला?
जवा पीळ पडंल भुकंनं
तवा पुरावा इचारा आतड्याला...
तुमचं काळं पांघरुन
तिकडं चूलीत घाला
पह्यलं ऊसाच्या अन् दुधाच्या
भावाचं बोला....

लय झालं तुमचं 
डोळ्यात चटणी फेकणं
मेल्यावर शेतकरी मग
लाखाचं चेक लिव्हणं

आपलंच डोळं उघडून
आता हवं जरा बघायला
शेत वरीसभर सगळ्यांनी
एकीनं पडाक पाडायला...
तवा म्हणतील सगळेच
पह्यलं पिकवायचं बोला!
पह्यलं पिकवायचं बोला !!

*अनिल सा.राऊत *
9890884228

No comments:

Post a Comment